Chief of Center, Pradeep Rajput : विद्यार्थ्यांसाठी ‘गणित, विज्ञान अध्ययन समृद्धी’ कार्यक्रम राबवावा : केंद्रप्रमुख प्रदीप राजपूत

0
18

कुसुंबे खुर्दला आयोजित शिक्षण परिषदेत प्रतिपादन

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक सुलभ, आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण होण्यासाठी डॉ. जयंत नारळीकर यांचा “गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम” काटेकोरपणे राबविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रप्रमुख प्रदीप राजपूत यांनी केले. जळगाव तालुक्यातील चिंचोली केंद्राच्या जिल्हा परिषदेच्या कुसुंबे खुर्द येथील उच्च प्राथमिक शाळेत शिक्षण परिषद नुकतीच पार पडली. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. परिषदेत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

व्यासपीठावर बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील, मुकुंदा इंगळे, विलास चौधरी, संजय पाटील, संजय इखे, उषा माळी, अलका पालवे, चित्रलेखा वायकोळे आदी उपस्थित होते. परिषदेत शिक्षणातील नवीन प्रयोग, अभ्यासक्रमातील सुधारणा तसेच अध्ययन-अध्यापनात नव्या तंत्रांचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ पुस्तकाभिमुख न राहता प्रत्यक्ष अनुभवाधारित शिक्षण देणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांच्या अध्ययन समृद्धीसाठी मांडल्या नवीन उपाययोजना

डिजिटल साधनांचा वापर, उपक्रमाधारित अध्ययन-अध्यापन, वाचन-संशोधनाची सवय लावणे तसेच कौशल्याधारित शिक्षणावर भर द्यायला हवा. शिक्षक हेच अध्ययन समृद्धीचे मूळ घटक आहेत. त्यांचा सक्रिय सहभाग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेत मोठा फरक निर्माण करतो, असे तज्ज्ञ मार्गदर्शक मुकुंदा इंगळे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करतांना सांगितले. चर्चेत शिक्षकांसह मार्गदर्शकांनी सहभागी होऊन आपल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या अध्ययन समृद्धीसाठी नवीन उपाययोजना मांडल्या. शिक्षण परिषदेत झालेल्या चर्चेमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात गुणवत्ता आणि सुलभता आणण्यासाठी ठोस दिशा मिळाल्याचे दिसून आले. सूत्रसंचालन तथा आभार मनीषा राठोड यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here