साईमत, मलकापूर : प्रतिनिधी
नांदुरा तालुक्यातील चांदुरबिस्वा येथील सासर असलेल्या विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना २५ नोव्हेंबर रोजी पुणे येथे घडली. याप्रकरणी विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून सासु, सासरे व पतीविरूध्द विविध कलमान्वये गुन्हे दाखल केला आहे. तसेच तिघांना पुणे येथे अटक केली आहे.
मयत विवाहितेचे वडील रमेश रामभाऊ चोपडे (वय ५३) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांची मुलगी दिक्षाचा विवाह ८ मे २०२१ रोजी पवन प्रल्हाद तायडे (रा.हनुमान नगर, चांदुरबिस्वा, ता.नांदुरा, ह.मु.म्हसोबा मंदिराजवळ, गवळीनगर, भोसरी, पुणे) यांच्याशी झाला होता. लग्नानंतर मुलगी दिक्षा रक्षाबंधनाला माहेरी आली होती. तिने पती व सासू-सासरे यांनी काही दिवस चांगली वागणूक दिली. मात्र, आता ते काही ना काही कारणावरून बोलतात. पती मारहाण करून त्रास देतो, असे सांगितले होते. त्यानंतर मुलीला मे २०२२ मध्ये मुलगा झाल्याने तिला सासरकडून होणारा त्रास कमी होईल, असे वाटले. मात्र, मुलाच्या खर्चासाठी माहेरून पैसे आण, असे म्हणून मुलीला त्रास देणे त्यांनी सुरूच ठेवले. त्यानंतर मार्च-एप्रिल २०२३ मध्ये मुलीने फोन करून सांगितले होते की, पती पवन तायडे हा नवीन फ्लॅट घेण्याकरीता माहेरून १० लाख रुपये आण, असा सारखा तगादा लावत होता. त्या कारणावरून त्रास देत आहे. पैसे न आणल्यास घरातून हाकलून देवू, घटस्फोट देवू, अशा धमक्या देत असल्याचे सांगितले होते.
फ्लॅट घेण्यासाठी माहेरवरून १० लाख रूपये आणण्याचा लावण्यात आलेला तगादा, सासरकडील मंडळीच्या इच्छेविरूध्द मुलास जन्म दिला म्हणून नेहमी सासरकडील मंडळीकडून होणारा त्रास व मारहाणीला कंटाळून अखेर दिक्षा हिने २५ नोव्हेंबर रोजी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तत्पूर्वी तिने ३ पानांची सुसाईड नोट लिहून त्यामध्ये सासरकडील मंडळीकडून होणाऱ्या त्रासाबाबत लिहिले असून ती काही नातेवाईकांना सुध्दा पाठविली आहे. या तक्रारीवरून पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड येथे पती पवन प्रल्हाद तायडे, सासू प्रमिला तायडे, सासरा प्रल्हाद लक्ष्मण तायडे यांच्याविरूध्द अप.नं.९१२/२३, कलम ३०४ (ब), ३०६, ४९८ (अ), ३२३, ५०५, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे.