साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी
राज्य सरकारतर्फे एसटी महामंडळाच्या नव्या बस आणि डिझेलच्या बसचे सीएनजीमध्ये रूपांतर करण्यासाठी २९८ कोटी ८३ लाख रुपयांचा निधी वितरित करण्याचा निर्णय सोमवारी जाहीर करण्यात आला. या निधीच्या माध्यमातून महामंडळाच्या बस स्थानकांचे बांधकाम, पुनर्बांधणी आणि आधुनिकीकरणदेखील करण्यात येणार आहे.
राज्य सरकारतर्फे यंदाच्या अर्थसंकल्पात एसटी महामंडळासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षांत महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी चार हजार १०७ कोटी रुपयांची आर्थिक मदत केली होती. त्यानंतर आता २९८ कोटींच्या निधीच्या वितरणाची घोषणा राज्य सरकारतर्फे करण्यात आली आहे. एसटी महामंडळाच्या आधुनिकतेसाठी पावले उचलण्यात आली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून एसटीच्या बस आगारांचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यात येणार आहेत. डिझेलच्या वाढत्या किंमती व प्रदूषणाला आळा घालण्यासाठी नव्या सीएनजी बसची खरेदी होणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या अर्थसंकल्पात महामंडळासाठी मोठी आर्थिक तरतूद केली होती. आता एसटी महामंडळाला हा निधी वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.