साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील वालझरी पिंपरखेड येथे टकारखान शिवाराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत इम्रान खान यांच्या शेतातील गायीच्या वासराचा बिबट्याने शुक्रवारी मध्यरात्री फडशा पाडला. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी बिबट्याने वलझरी शिवारातील एका उसाच्या शेतात वासराचा फडशा पाडला होता. वनविभागाला त्याची माहिती दिली. मात्र, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यावर अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही. सध्या शेतात मका तयार करणे, कापूस वेचणी अशी कामे सुरू आहे.
पिंपरखेड परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे शेतकरी व मजूर भयभीत झालेले आहे. मजूर बिबट्याच्या भीतीने शेतात कामास यायला तयार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. वनविभागाने तात्काळ बिबट्याला पकडण्यासाठी योग्य ती उपाय योजना करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.