साईमत, भडगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील वाडे, बहाळ आणि नावरे शिवारात बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे वनविभागासह संबंधितांनी त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.
सविस्तर असे की, भडगाव तालुक्यातील वाडे, बहाळ तसेच नावरे शेतशिवारात मागील सहा महिन्यांपासून बिबट्याचा वावर सुरु आहे. त्या बिबट्याने आतापर्यंत ८ ते ९ वासरांचा फडशा पाडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. १० ऑगस्ट रोजी वाडे गावातील शेतकरी प्रभाकर विठ्ठल पाटील यांच्याही शेतात तारेचे कुंपण तोडून बिबट्याने वासरीचा फडशा पाडला आहे. अशीच घटना ८ दिवसांपूर्वी विकास नारायण पाटील यांच्या शेतातही घडली होती. अशा घटना वारंवार घडत असून वन विभाग काहीच करताना दिसत नाही. आधीच पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. त्यात पशुधनाची हानी होत असेल तर शेतकऱ्यांनी जगावे तरी कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुक्या जनावरांवर हल्ला होतोय उद्या उठून माणसांवर हल्ला झाला तर त्याला जबाबदार कोण असेल? असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे.
…अन्यथा उपोषणाची परवानगी द्या
वन विभागाने यासंदर्भात तात्काळ दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा, असे आदेश वनविभागाला द्यावे, अन्यथा उपोषणाची परवानगी द्यावी, अशा आशयाच्या मागणीचे निवेदन शेतकरी संघटनेचे अखिलेश पाटील, अक्षय पाटील, भाऊसाहेब माळी, कुलदीप पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी भडगावचे तहसीलदार मुकेश हिवाळे यांना दिले आहे.