पिंप्राळा शिवारात बकऱ्या चारणाऱ्या तरुणावर बिबट्याचा हल्ला

0
37

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी

तालुक्यातील पिंप्राळा शिवारात बकऱ्या चारणाऱ्या ३२ वर्षीय अपंगावर बिबट्याने अचानक हल्ला केला. यावेळी आरडाओरड केल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी धाव घेताच बिबट्याने जंगलाकडे धूम ठोकली. या घटनेत जखमी झालेल्या तरुणाला मुक्ताईनगर आणि तेथून जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे .

सविस्तर असे की, एका हाताने अपंग असलेले गणेश गणपत झाल्टे (वय ३२) हे नेहमीप्रमाणे कंपार्टमेंट नं ५७४ वनविभागाच्या हद्दी जवळील शेत गट नं.१६२ मध्ये बकऱ्या चारत होते. मात्र, दुपारी दीड वाजेच्या सुमारास अचानक मागून बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी गणेश झाल्टे यांनी आरडाओरड केल्याने लगतच्या शेतात असलेल्या अजाबराव झाल्टे आणि इतर नागरिकांनी धाव घेत बिबट्याला हाकलून लावल्याने त्याने जंगलाकडे धूम ठोकली. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेले गणेश झाल्टे यांना अजाबराव झाल्टे, पिंप्राळा पोलीस पाटील महादेव झाल्टे, सरपंच रामचंद्र कोळी व नातेवाईकांनी तात्काळ कुऱ्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आणले. वनविभागाचे वनपाल पाचपांडे, गवळी, श्रीमती मराठे, वनरक्षक डी. एम. धूळगुंडे, ए.एस.मोरे, एस.एस. गोसावी यांनी कुऱ्हा येथून मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारार्थ हलविले. मात्र, बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गणेश झाल्टे यांना तातडीने जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. प्रभारी वनक्षेत्रपाल दत्तात्रय लोडे यांनी जखमीची भेट घेवून माहिती जाणून घेतली.

शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

शनिवारी, २ डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास बकऱ्या चारणाऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची माहिती परिसरात पसरताच शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वनविभागाने मानवी रक्त लागलेल्या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here