पारंपारिक खेळ आणि नात्यांची उंच भरारी
साईमत /जळगाव/प्रतिनिधी :
पारंपारिक खेळांचे महत्त्व जाणून घेणे आणि पालक-पाल्यांमधील नाते अधिक घट्ट करणे, या उद्देशाने ‘पालक शाळा’ तर्फे मकर संक्रांतीनिमित्त मेहरुण तलावाच्या काठावर अभिनव पतंग उत्सवाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला मलार कम्युनिकेशनचे अनमोल सहकार्य लाभले.
उत्सवात पालक शाळेचे संचालक रत्नाकर पाटील, डॉ. अनंत पाटील, समन्वयक कृणाल महाजन आणि आनंद मलारा यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात करताना कृणाल महाजन यांनी ‘पालक शाळा’ संकल्पनेची माहिती दिली, तर डॉ. अनंत पाटील यांनी या उपक्रमाच्या आयोजनामागील हेतू सविस्तर मांडला.
मेहरुण तलावाच्या परिसरात आयोजित या उत्सवात सुमारे ६० ते ७० पालक आणि मुलांनी सहभाग नोंदवला. ५ ते १५ वयोगटातील मुलांचा उत्साह पाहण्यासारखा होता. निळ्या आकाशात उंच भरारी घेणाऱ्या रंगीबेरंगी पतंगी आणि पतंग कापल्यानंतर होणारा जल्लोष यांनी कार्यक्रमाची ऊर्जा दुहेरी केली. खेळाच्या माध्यमातून मुलांचे आणि पालकांचे बॉन्डिंग वाढावे, हा यामागचा मुख्य उद्देश यशस्वी झाला, असे दिसून आले.
उत्सवात सामाजिक जबाबदारीचा मुद्दाही लक्षात घेण्यात आला. आयोजकांनी सर्व पालकांना मतदानाचा महत्त्वाचा संदेश दिला, “मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे, त्यामुळे मतदानाच्या दिवशी सकाळी लवकरात लवकर आपला हक्क बजावावा,” असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलेश पाटील, क्षितिजा देशपांडे, अश्विनी पटवर्धन, सचिन कोल्हे आदींनी विशेष मेहनत घेतली.पालक आणि मुलांच्या हसऱ्या चेहऱ्यांनी रंगलेला हा उत्सव सामाजिक नात्यांचे आणि परंपरेच्या जपणुकीचे एक आदर्श उदाहरण ठरला.
