साईमत, धानोरा, ता. चोपडा ः वार्ताहर
मी तुम्हाला काय सांगू मायबाप हो… गोठ्यात ‘गाय’ आणि घरात ‘माय’ नसली तर घराला घरपण येत नाही. यासाठी सर्वांनी आपल्या गोठ्यात गाय आणा व जे काही महाभाग असतील की, ते आपल्या आईला सांभाळत नसेल त्यांनी आपल्या आईला घरी आणा व घराला खरे घरपण मिळवून द्या. तसेच आई-वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. ‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी’ असे अनेक उदाहरणे देऊन गायही आपली मायच आहे. माय-बापहो थोड्याफार पैशासाठी गायीला कत्तलखान्यात विकू नका जर तुमच्याने त्या गायीचा सांभाळ होत नसेल तर आपल्या तालुक्यातील गौशाळेत घेऊन जा, असे आवाहनही बालकिर्तनकार ह.भ.प. दुर्गेश महाराज यांनी केले.
यावल तालुक्यातील चुंचाळे येथे श्री समर्थ सुखनाथ बाबा, रघुनाथ बाबा, वासुदेव बाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीत जागतिक मातृदिनानिमित्त एक दिवशीय किर्तन आयोजित केले होते. त्यावेळी त्यांनी आई-वडिलांची महती सांगितली. किर्तन श्रवण करत असताना बसलेल्या अनेक महिलांसह पुरुषाच्या डोळ्यांत अश्रू निघत होते.
विज्ञानाने जरी कितीही प्रगती केली असली तरी खरा आनंद हा अध्यात्मातूनच मिळू शकतो. त्यासाठी प्रत्येकाने परमार्थ साधावा. तसेच समाजातील गुणदोष त्यांनी आपल्या प्रबोधनपर किर्तनातून स्पष्ट केले. हिंदू धर्माला संघटनाची नितांत गरज आहे, असेही बालकिर्तनकार दुर्गेश महाराज यांनी सांगितले. यावेळी ह.भ.प.प्रल्हाद पाटील, अरुण कोळी, संजय चौधरी, कृष्णा पाटील, सुधाकर चौधरी, सरदार पाटील, भिमराव राजपूत, गायनाचार्य चंदन महाराज, देवा महाराज, आदेश महाराज, चेतन महाराज, टाळकरी मंडळी तसेच महिलांसह पुरुषांचा जनसमुदाय उपस्थित होता.