फत्तेपुरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित मोहिमेत प्रतिपादन
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
महिलांचे आरोग्य हेच कुटुंबाच्या बळाचे मूळ आहे. महिलांना योग्य तपासणी, पोषण, जागरूकता मिळाली तरच परिवार सशक्त, निरोगी राहील. ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ मोहिमेतून गावागावात आरोग्य तपासण्या, मार्गदर्शनासह जनजागृती करून महिलांचे आरोग्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे ‘निरोगी नारीशक्ती’ हीच खऱ्या अर्थाने कुटुंबाची ‘कवचकुंडले’ असल्याचे प्रतिपादन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी केले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस (१७ सप्टेंबर) ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती (२ ऑक्टोबर) या कालावधीत जामनेर तालुक्यात “स्वस्थ नारी सशक्त परिवार” मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिमेला जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी सेवानिवृत्त अभियंता तथा सामाजिक कार्यकर्ते जे.के. चव्हाण, माजी जि.प. सदस्य दिलीप गायकवाड, डॉ. भरत पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अशोक भोईटे, सरपंच पुष्पा शेजुळे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रवींद्र भन्साळी, मयूर पाटील, संदीप साळवे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते फीत कापून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून १२६ महिलांची तपासणी
सुरुवातीला कॅन्सर तपासणी शिबिर घेण्यात आले. त्यात जळगाव जिल्हा रुग्णालय येथून आलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने १२६ महिलांची तपासणी केली. त्यात स्तन कर्करोगासाठी १७, गर्भाशय कर्करोगासाठी १४ व मुख कर्करोगासाठी १ अशा ३२ महिलांची पुढील तपासणीसाठी नोंदणी करण्यात आली. मोहिमेत रक्तदाब, मधुमेह, नेत्ररोग, दंतरोग, गरोदर व स्तनदा माता तपासणी, सिकल सेल, ॲनिमिया तपासणी, मासिक पाळी स्वच्छता मार्गदर्शन, पोषण आहाराबाबत जनजागृती अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
यांची लाभली उपस्थिती
शिबिरासाठी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. रुपाली कळसकर, दंतरोग तज्ज्ञ डॉ. राजाराम देशमुख, बालरोग तज्ज्ञ डॉ. स्वप्नील कळसकर आपल्या स्टाफसह उपस्थित होते. याप्रसंगी महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी राऊत, वैद्यकीय अधिकारी डॉ. शारीख काद्री, डॉ. संदीप जाधव, आरोग्य सहाय्यक रवींद्र गिरी, बबन पवार, गटप्रवर्तक सुनीता पाटील, रेखा तायडे तसेच सर्व आरोग्य सेवक, सेविका, आशा, अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तसेच सामाजिक, राजकीय क्षेत्रातील प्रतिनिधींमध्ये पुष्पा शेजुळे, सलीम पटेल, ईश्वरसिंग राजपूत, आत्माराम गावंडे, पंकज चोपडे, राजू पाटील, आबा पाटील, आनंदा लव्हारे, सुनील मोरे, नितीन पाटील, विश्वनाथ शिंदे, राहुल चौधरी, विशाल धांडे, राजू मानकर, सुभाष शिनगारे, रितेश गोडवे, स्वप्नील गायकवाड आदी उपस्थित होते. प्रास्ताविक तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, सूत्रसंचालन सुरेश सोनार तर आभार आरोग्य सहाय्यक रवींद्र गिरी यांनी मानले.