साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील पिंपळी येथील आगग्रस्त कुटुंबाला नर्मदा मेडिकल फाउंडेशन डॉ.अनिल शिंदे यांच्यातर्फे आर्थिक रोख रकमेची मदत करून दिलासा दिला आहे. पिंपळी येथील दिलीप नामदेव पाटील यांच्या घराला २४ मार्च रोजी सायंकाळी अचानक आग लागली होती. सिलिंडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर जळून खाक झाले होते. घरातील कर्ता पुरुष दिलीप पाटील यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता. आग लागताच दिलीप पाटील यांनी त्यांच्या पत्नी, मुलगा आणि नात याना वाचविण्यासाठी घराबाहेर ढकलले होते. मात्र, त्यांना घराबाहेर निघता न आल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. काही क्षणातच घरातील संपूर्ण कपडे, रोख रक्कम, गृहोपयोगी वस्तू, किराणा दुकानातील माल, अन्न धान्य तसेच मुलगा प्रीतम याचे सर्व शैक्षणिक कागदपत्रे जळून गेले होते. ते लक्षात आल्यावर डॉ.अनिल शिंदे यांनी शैक्षणिक मंडळाच्या अधिकाऱ्यांशी फोनवर बोलून सर्व कागदपत्रे परत मिळविण्याचे आश्वासन घेतले. तसेच रोख ११ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. नर्मदा मेडिकल फाउंडेशन आपल्या सोबत असल्याचे आश्वासन डॉ. अनिल शिंदे यांनी दिले.
याप्रसंगी डॉ.अनिल शिंदे यांच्यासह प्रा.सुभाष पाटील, धनगर अण्णा, सुधाकर महाजन आबा, दिनेश पवार, मुरलीधर महाजन, प्रकाश पाटील, निलेश महाजन, रमेश शेलकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
खेडी अमळगाव येथील शेतकऱ्यांना मदत
काही दिवसांपूर्वी खेडी अमळगाव येथे रात्रीच्या वेळेस अचानक भगवान पाटील आणि कैलास पाटील यांच्या म्हशींच्या गोठ्याला आग लागली होती. त्यात दोन म्हशी आगीत भाजल्या होत्या. त्यांना वाचविण्यासाठी गेलेले शेतकरी जखमी झाले होते. त्यात शेतीपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना नर्मदा मेडिकल फाउंडेशन डॉ.अनिल शिंदे यांच्याकडून पाच हजार रोख रक्कम देऊन मदत केली आहे.