साईमत, मलकापूर : प्रतिनिधी
स्थानिक पद्मश्री वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथील इलेक्ट्रिकल इंजिनिअर पदावर कार्यरत कर्मचारी स्व. शरद पवार यांचे काही दिवसांपूर्वी अकस्मात निधन झाले होते. कॉलेजच्या स्टाफ वेल्फेअर असोसिएशन कमिटीच्यामार्फत लोकसेवा शिक्षण बहुउद्देशीय मंडळाचे चेअरमन डी. एन. पाटील, उपाध्यक्ष नानासाहेब पाटील, खजिनदार सुधीर पाचपांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांच्या हस्ते आर्थिक मदत म्हणून एक लाख रुपयांचा धनादेश त्यांच्या पत्नी सुलभा पवार यांना सुपूर्द करण्यात आला. त्या महाविद्यालयातच कार्यरत आहेत.
मयत शरद पवार यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. मुलगा सैनिकी कॉलेजमध्ये शिकत असून एनडीए परीक्षेची तयारी करत आहे. मुलगी बीडीएसला उच्चशिक्षण घेत आहे. पवार हे अत्यंत मनमिळाऊ आणि हुशार व्यक्तिमत्त्व होते.
यावेळी श्रद्धांजली वाहतांना महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणाले की, आम्ही एक हुशार आणि होतकरू कर्मचारी गमावला. आपली कामे वेळेवर करायचा. आदेश पाळायचा. संस्थेमार्फत आम्ही केलेल्या मदतीतून त्यांच्या परिवाराला थोडा हातभार लागेल, हीच अपेक्षा.
यावेळी महाविद्यालयाचे डीन डॉ. युगेश खर्चे, स्टाफ वेल्फेअर असोसिएशन कमिटीचे सचिव प्रा. सचिन चौधरी, सहसचिव रमाकांत राणे, सदस्य प्रा.मंजिरी करांडे, तेजल खर्चे, लायब्ररी प्रमुख संगिता खर्चे, प्रा. मधुकर टेकाडे, अनिता होले आदी कर्मचारी उपस्थित होते.