नागपूर-पुणे ‘वंदे भारत’ एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
जळगावसह विदर्भ, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना पुण्याच्या प्रवासासाठी जलद, आरामदायी आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणारा ऐतिहासिक क्षण रविवारी, १० ऑगस्ट रोजी आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नागपूर-पुणे ‘वंदे भारत’ एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. गाडीच्या मार्गात भुसावळ आणि जळगाव अशा दोन्ही स्थानकांचा समावेश असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांना त्याचा थेट लाभ होणार आहे. भुसावळ आणि जळगाव रेल्वे स्थानकांवर या गाडीचे जंगी स्वागत करण्यात आले. भुसावळ येथे केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी हिरवा झेंडा दाखवून गाडीला शुभेच्छा दिल्या.
जळगाव स्थानकावर खा.ॲड.उज्ज्वल निकम, खा.स्मिता वाघ आणि आ. सुरेश (राजू मामा) भोळे यांच्या हस्ते गाडीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. या सोयीमुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक आठवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पंतप्रधानांनी एकाचवेळी बेंगळुरू-बेळगाव आणि कटरा-अमृतसर वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचाही प्रारंभ केला