पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रेरणेतून भव्य नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर; ५८३ नागरिकांची नोंदणी, २३५ रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया
साईमत /पाळधी (ता. धरणगाव)/ प्रतिनिधी
“डोळ्यांना दृष्टी देणे म्हणजे केवळ वैद्यकीय उपचार नव्हे, तर एखाद्या कुटुंबाच्या आयुष्यात आनंदाचा दिवा पेटवणे आहे. गरीब आणि वंचितांच्या जीवनात प्रकाश आणणे हेच खरे समाजकार्य आहे,” असे भावपूर्ण प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाळधी येथे आयोजित भव्य दृष्टीदान उपक्रमात केले.
समाजसेवेचा खरा अर्थ म्हणजे गरजूंना नवजीवन देणे, हा संदेश घेऊन पाळधीत “दृष्टीदानाचा महायज्ञ” उत्साहात पार पडला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रेरणेतून तसेच जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या पुढाकारातून जीपीएस मित्र परिवाराच्या वतीने नेत्र तपासणी व मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते.
पाळधी येथील शासकीय विश्रामगृह परिसरात सकाळपासूनच गावोगावातून आलेल्या शेकडो नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. ज्येष्ठ नागरिकांसह महिलांचा आणि तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग या शिबिरात दिसून आला. एकूण ५८३ नागरिकांची नेत्र तपासणीसाठी नोंदणी करण्यात आली.
त्यापैकी २३५ रुग्णांना पुढील मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी पनवेल येथील सुप्रसिद्ध शंकरा नेत्र रुग्णालय येथे पाठविण्यात आले. या निर्णयामुळे अनेकांच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश परतणार आहे.
कार्यक्रमास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन रुग्णांची आस्थेने विचारपूस केली आणि संपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, “अशा सेवा उपक्रमांमुळे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचते.”
शिबिरात आलेल्या सर्व रुग्णांसाठी नाश्ता व जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. कोणताही आर्थिक मोबदला न घेता संपूर्ण सेवा मोफत देण्यात आल्याने लाभार्थ्यांनी आयोजकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
या यशस्वी उपक्रमासाठी शंकरा हॉस्पिटलची तज्ज्ञ वैद्यकीय टीम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चव्हाण, स्थानिक डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका तसेच जीपीएस मित्र परिवार, शिवसेना व युवासेना कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
दृष्टीदानाच्या या महायज्ञामुळे पाळधी परिसरात मानवतेचा आणि समाजसेवेचा दीप अधिक तेजाने उजळल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
