Home जळगाव संयमाच्या साथीने ‘लक्ष्यवेधी’ मनोवृत्ती; ना. रक्षा खडसे व्यासंगी नेतृत्वाच्या धनी

संयमाच्या साथीने ‘लक्ष्यवेधी’ मनोवृत्ती; ना. रक्षा खडसे व्यासंगी नेतृत्वाच्या धनी

0
84
विकास पाटील, साईमत, जळगाव :
ना. रक्षा निखिल खडसे (जन्म इ.स. १९८७) लोकसभेच्या सदस्य म्हणून नुकत्याच भाजपचा गड रावेर मतदारसंघातून निवडून आल्या  आहेत. भाजपच्या श्रीमती खडसे यांनी या निवडणुकीत राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांचा पराभव केला. त्या आता सलग तिसऱ्यांदा रावेर मतदारसंघाच्या खासदार झाल्या आहेत.
रावेर लोकसभा मतदारसंघ २००८ च्या परिसीमनानंतर अस्तित्वात आला. येथे पहिल्यांदा २००९ मध्ये निवडणूक झाली. भाजपचे हरिभाऊ जावळे यांनी मोठा विजय नोंदवला. तेव्हापासून ही जागा भाजपकडे आहे.  या आधी २०१९ मध्ये रावेर लोकसभा मतदार संघातून खडसे दुसऱ्यांदा लोकसभेसाठी निवडून आल्या. त्यांनी २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये रावेर मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार मनीष जैन यांचा तीन लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला होता. या निवडणुकीत त्यांना ६ लाख ५ हजार ४५२ मते मिळाली होती. हीना गावित यांच्यासोबत रक्षा खडसे १६ व्या लोकसभेमधील सर्वात तरुण सदस्य (वय २६) होत्या. त्या मुक्ताईनगरच्या रहिवासी व भाजपनेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा आहेत
खा. रक्षा खडसे २०१० पासून राजकारणात सक्रिय आहेत. त्या कोथळी गावच्या सरपंच होत्या. नंतर त्या जिल्हा परिषद सदस्यपदी निवडून आल्या. २०१४  व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्या रावेर मतदारसंघातून निवडून आल्या.
वयाच्या २० व्या वर्षी कोथळीच्या सरपंच, त्यानंतर जिल्हा परिषदेत सभापती म्हणून काम करताना त्यांना सासरे नाथाभाऊ खडसे यांच्याकडून जिल्ह्याच्या राजकारणाचे बारकावे समजून घेता आले. आधी दहा वर्षे खासदार म्हणून काम करताना त्यांनी पीक विमा योजनेतील कंपन्यांची मनमानी संपवून शेतकऱ्यांना लाभ मिळवून देताना आपली वचनबध्दता दाखवून दिली. केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही त्यांनी केलेले काम राज्यात लक्षवेधी ठरले होते.
योगायागाने म्हणता येईल पण, रक्षा खडसे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा पहिल्यांदा निर्णय घेतल्यापासून व खासदार म्हणून निवडून आल्यावर राजकीय कारकिर्दीला सुरूवात केल्यापासून देशात व राज्यातही बरीच राजकीय स्थित्यंतरे अनुभवली. या  स्थित्यंतरांच्या गदारोळात आपल्या जात्याच संयमी स्वभावाने त्यांनी आपण राजकारणातील वेगळे व्यक्तीमत्व असल्याचेही त्यांनी दाखवून दिले. राजकारणातील उठवळ भूमिका घेऊन एका रात्रीत सवंग लोकप्रियता मिळवू पाहणाऱ्या प्रवृत्तींच्या तुलनेत रक्षा खडसे नेहमी उजव्या ठरल्या. वैयक्तिक व कौटुंबिक पातळीवर मन व्यथित करणाऱ्या घटनांची किनार रक्षा खडसे यांच्या आयुष्याला आहे ; या घटनांचा उल्लेख कितीही टाळले तरी टाळता येणारा नाही. तरीही त्या सगळ्या प्रतिकुलतेला पुरून उरल्या हे अधोरेखित करण्यासाठी हा संदर्भ येथे द्यावा लागतो आहे.
राज्यात प्रभाव व वजनदार असलेले सासरे  नाथाभाऊ खडसे यांचा आपल्या राजकीय वाटचालीतील सहभाग महत्वाचा असल्याचे त्यांनी आजही केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होताना नम्रपणे नमूद केले. सासरे  नाथाभाऊ खडसे यांच्यासारखी ‘लक्ष्यवेधी’ मनोवृत्ती असली की समस्यांची तीव्रता स्वाभाविकपणे कमी होऊन जाते, हा नियम अन्य क्षेत्रांसारखा राजकीय वाटचालीतही तंतोतंत लागू होतो, हेच त्यांनी राजकारणातल्या आजपर्यंतच्या भूमिकेतून दाखवून दिले आहे.
जिल्ह्यात संयमी राजकीय नेतृत्व म्हणून स्वत:ला सिध्द केल्यांनतर त्यांच्या या स्वभावानुसार त्या आता केंद्रीयमंत्री म्हणून काम करताना प्रभाव दाखवतील, यात शंका नाही. रक्षा खडसे यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची बातमी समोर आल्यानंतर एकनाथ खडसे म्हणाले आहेत की, अनेक वर्षांपासून घेतलेल्या परिश्रमाचे चीज रक्षाताईंच्या मंत्रीपदाच्या माध्यमातून होत आहे. माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाच्या क्षणांपैकी हा क्षण असून माझे आनंदाश्रू आवरले जात नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here