Vitthal During The Chariot Festival In Pimprala : पिंप्राळ्यातील रथोत्सवात विठ्ठलाच्या जयघोषात भरला ‘भक्तांचा मेळा’

0
3

रथोत्सवात लेझीमच्या तालावर आ.सुरेश भोळे यांनीही धरला ठेका 

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावातील पिंप्राळा येथे रविवारी, ६ जुलै रोजी पांडुरंगाच्या रथोत्सवाच्या आयोजन केले होते. रथोत्सवात मोठ्या भक्तीमय वातावरणात ‘जय जय रामकृष्ण हरी’चा जयघोष करत ‘जय हरी विठ्ठलाचा’ जयघोष करत रथोत्सव पिंप्राळा येथून काढण्यात आला. रथोत्सवात विठ्ठलाच्या जयघोषात ‘भक्तांचा मेळा’ भरल्याचे दिसून आले. पिंप्राळा उपनगरातील श्री विठ्ठल मंदिर संस्थान, वाणी पंचमंडळ, ग्रामस्थ मंडळींच्या सहकार्याने आषाढी एकादशीनिमित्त रथोत्सव यशस्वी पार पडला.

रथोत्सवाची जवळपास १५० वर्षाची परंपरा आहे. त्यामध्ये ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक वेशभूषा परिधान करत भक्तगणांनी आपला सहभाग नोंदविला होता. जे भाविक पंढरपूरला जाऊ शकत नाही ते भाविक याठिकाणी विठुरायाच्या दर्शनासाठी येतात. यावेळी जळगाव शहराचे आ.सुरेश भोळे यांनीही लेझीमच्या तालावर ठेका धरला.

रथाला पानाफुलांनी सजवून, आकर्षक दिव्यांची रोषणाई केली होती. रथोत्सव पाहण्यासाठी खान्देशातील विठ्ठलभक्त आले होते. सकाळी श्री विठ्ठल मंदिरात पहाटे पाचला विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींचा महाअभिषेक व पूजन झाले. यानंतर रथाची महापूजा झाली. ‘पांडुरंग हरी वासुदेव हरी’च्या नामघोषात आ.सुरेश भोळे आदींसह भक्तगणांनी दोराने रथ ओढण्याचा आनंद लुटला. रथापुढे पालखी, भजनी मंडळ, दिंडी, भगवे झेंडे, गुरव मंगल वाद्य, लेझीम, भवानी देवीची सोंग आदी भाविकांचे आकर्षण ठरले.

विवेकानंद शाळेतील विद्यार्थ्यांसह शिक्षक रथोत्सवात सहभागी

शहरातील पिंप्राळा येथे होणाऱ्या रथोत्सवात विवेकानंद प्रतिष्ठान संचलित प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील २५ ते ३० विद्यार्थ्यांनी व शिक्षकवृंद यांनी विठ्ठल मंदिरात एकत्र जमून विठुरायाच्या नामघोषात ‘जय जय राम कृष्ण हरी’ असा गजर करत रथोत्सवात विद्यार्थ्यांसह शिक्षक सहभागी झाले होते. तसेच श्री विठ्ठल मंदिर संस्थान पिंप्राळा वाणी पंच मंडळ यांच्यावतीने शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्रीराम लोखंडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जयश्री वंडोळे, वैशाली पाटील, आकाश शिंगाणे, स्वप्नील पाटील, शैलेश बागडे, विजय निंबाळकर उपस्थित होते. यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक हेमराज पाटील, मनोज कुलकर्णी महाराज, समन्वयक सचिन गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here