एक लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात बकाऱ्या चोरीचे प्रमाण वाढले असल्याने पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना गुन्हे उघडकीस आणणे बाबत आदेश दिले होते. त्यावर बबन आव्हाड यांनी पीएसआय गणेश वाघमारे, दत्तात्रय पोटे, पो.ह. संदीप पाटील, हरीलाल पाटील, मुरलीधर धनगर, प्रवीण भालेराव, महेश पाटील, सागर पाटील, ईश्वर पाटील, दीपक चौधरी अश्यांचे पथक तयार केले होते.
नमुद पथकातील अधिकारी व अमंलदार यांनी तांत्रिक व गुप्त बातमीदारामार्फत गोपनीय माहिती मिळाली की, चाळीसगाव ग्रामीण पो.स्टे. दाखल गु.र.क्र. २८१/२०२४ भा.न्या.सं. कलम ३०९ (४), ३(५) प्रमाणे दाखल गुन्हा हा भवाळी, ता. चाळीसगाव येथील राहणारा चेतन गायकवाड याने त्याच्या साथीदारासह केला असल्याची बातमी मिळाली. त्यावेळी नमुद अधिकारी व अमंलदार हे दोन दिवसापासून भवाळी भागात पाळत ठेवून होते.
त्यांना ३ ऑक्टोबर २०२४ रोजी खात्रीशीर बातमी मिळाली की, चेतन गायकवाड व त्याचे साथीदार गावात आले आहेत. त्यावेळी नमुद पथकाने गावात जावून चेतन गायकवाड व त्याचे साथीदार यांना ताब्यात घेवून विचारपूस केल्यावर चेतन गायकवाड याने सांगितले की, त्याने व त्याच्या सोबत असलेले गोरख फकीरा गायकवाड, बबलु आबा जाधव, गोरख सुरेश गोकुळ, सोमनाथ भिकन गायकवाड, गोकुळ गायकवाड व शंकर मोरे (सर्व रा.भवाळी, ता.चाळीसगाव) अशांनी मजुरी व्यवसायनिमित्त ते हिंगोणे परिसरात जात होते.
तेव्हा तेथे त्यांनी एका शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये बकऱ्या असल्याची माहिती होती. म्हणून त्या सर्वांनी मिळून चारचाकी वाहनाने व मोटार सायकलने त्याठिकाणी जावून तेथे खाटीवर झोपलेल्या एकास धारदार शस्त्राचा धाक दाखवून शेडमधील १९ बोकड व ७ बकऱ्या त्यांनी सोबत आणलेल्या चार चाकी वाहनाने व मोटार सायकलने घेवून जावून विक्री केल्या.
विक्रीतून आलेली रक्कम त्यांनी वाटणी केली, असे सांगितल्याने तो व त्याचे इतर ४ साथीदार असे एकुण पाच आरोपी यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून एक लाख नऊ हजार रुपये आणि २६ हजार रुपये किमतीची गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल असा एक लाख ३५ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
तसेच उर्वरित आरोपी गोकुळ गायकवाड आणि शंकर मोरे यांना चाहुल लागताच ते पळून गेले. म्हणून ताब्यातील आरोपीतांना चाळीसगाव ग्रामीण पो.स्टे. दाखल गु.र.क्र. २८१/२०२४ भा.न्या.सं. कलम ३०९ (४), ३(५) या गुन्ह्याचे पुढील तपासकामी चाळीसगाव ग्रामीण पो.स्टे.च्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक, डॉ. महेश्वर रेड्डी, चाळीसगावच्या अपर पोलीस अधीक्षक, कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.