साईमत/न्यूज नेटवर्क/जळगाव :
तांबापुरातील शाह-ए-अवलिया मशीदजवळील तार गल्लीतील रहिवासी हनिफ अजीज बागवान हा युवक ख्वाजामिया दर्गाजवळ गोकुळ स्वीट समोर हातगाडीवर फळ विक्रीचा व्यवसाय करतो. तो नित्यनेमाप्रमाणे रात्री तांबापुराकडे येत असतांना त्याला रिंग रोडवर हॉटेल सायलीजवळ एक मनी पॉकेट सापडले होते. ते उघडून पाहिल्यावर त्यात आधारकार्ड, पॅनकार्ड, चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) सह काही रोकड रक्कमही होती. शिवाय काही अती महत्त्वाचे पुरावे होते. अशावेळी ‘हनिफ’ने मनात कुठलीही लालस न ठेवता पाकिटाच्या मूळ मालकाशी संपर्क साधून त्यांना पाकीट सुपूर्द केले. ‘हनिफ’ने दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याने प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे उदाहरण घडवून आणले आहे.
‘हनिफ’ने स्वतःच्या घरी येऊन निवांतपणे पॉकेटची झाडाझडती घेतली. तेव्हा त्याला सापडलेल्या पाकिटातील पुराव्यांवर कोणताही संपर्क क्रमांक सापडला नाही. घरच्या परिस्थितीमुळे ‘हनिफ’चे शिक्षण केवळ तिसरीपर्यंत झाले आहे. त्यामुळे त्याने आपली सुशिक्षित बहीण सुमय्याबीची मदत घेतली. तेव्हा पाकिटात जैन इरिगेशन सिस्टीमच्या व्हिजिटिंग कार्डावर जितेंद्र जैन नामक युवकाचा भ्रमणध्वनी नंबर सापडला. सापडलेल्या पॉकेटचे खरे मालक जितेंद्र जैन हे जैन इरिगेशनमध्ये नोकरीला कार्यरत आहे. त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांना शाम तारा कॉम्प्लेक्ससमोरील शहीद अब्दुल हमीद चौकात बोलाविले. क्षणाचाही विलंब न लावता जितेंद्र जैन यांनी आपल्या आईसोबत पोहचले. हनिफजवळील पॉकेट पाहून त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रुंनी वाट मोकळी करून दिली. यावेळी पाणावलेल्या डोळ्यांनी जैन यांनी ‘हनिफ’च्या पाठीवर शाबासकीची थाप मारुन त्याचे कौतुक केले.
प्रामाणिक युवकामुळे पॉकेट मिळाल्याचा आनंद
हरविलेल्या पॉकेटची सायंकाळपासून शोधाशोध करुन जैन यांनी निम्मे शहर पिंजून काढले होते. एकीकडे त्यांचे आजोबा आजारी असल्यामुळे एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल आहे तर दुसरीकडे त्यांचे विशेष पुरावे असलेले पॉकेट हरविल्यामुळे त्यांच्यावर जणू दुःखाचा डोंगर कोसळल्यासारखे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे ते फार हादरून गेले होते. हरविलेले पाकीट एका प्रामाणिक माणसाला मिळाल्यामुळे हरविलेले पॉकेट मिळाल्याचा आनंदही जितेंद्र जैन यांनी व्यक्त केला.
येथील सामाजिक कार्यकर्ते विकार खान, नियाजोद्दीन शेख, लुकमान शेख, सय्यद हिदायत, आसिफ शाह बापू यांच्या उपस्थितीत हरविलेले पॉकेटची शहानिशा करून पॉकेट मूळ मालक जितेंद्र जैन यांच्या स्वाधीन देण्यात आले. हनिफने प्रामाणिकपणासोबत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेशही दिला आहे. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.