बाजाराच्या दिवशी होतेय गर्दी ; वाहतुकीची कोंडी, संबंधितांचे दुर्लक्ष
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
शहरातील पिंप्राळा परिसरातील पांडुरंग साई नगरात सिमेंट काँक्रीटचे नव्याने रस्ते तयार केले आहेत. मात्र, हल्ली हे रस्ते वाहनचालकांसह पादचाऱ्यांसाठी राहिलेच नाहीत. पांडुरंग साईनगर येथे हुडकोकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यावरच मच्छीचा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांनीच ताबा मिळविला असल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे. रोज दुपारी ४ ते रात्री उशिरापर्यंत दुकाने सुरू असतात. पिंप्राळ्याचा बुधवारी बाजार असतो. त्यादिवशी तर मासे विक्रेत्यांच्या दुकानात प्रचंड गर्दी दिसून येते. त्यामुळे ग्राहक रस्त्यावरच कशी पण वाहन लावून वाहतुकीची कोंडी निर्माण करतात. अशा गंभीर समस्याकडे मनपा प्रशासनाने लक्ष देऊन संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील सुज्ञ नागरिकांनी केली आहे.
शहरातील पिंप्राळा परिसरातील हुडकोकडे जाणाऱ्या पांडुरंग साईनगर जवळील मेन रस्त्यावरच उघड्यावर अनधिकृतपणे मच्छी विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली आहे. त्यामुळे मोकाट श्वान नागरिकांच्या अंगावर धावून येतात. तसेच दुचाकी, रिक्षा चालक रस्त्यावरच वाहने लावतात. त्यांना काही बोलले की, किरकोळ वाद उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संबंधितांवर कारवाईची अपेक्षा
मच्छी विक्रेत्यांनी हा रस्ता बळकावला असल्याची ओरड काही सुज्ञ नागरिकांकडून होत आहे. रात्री उशिरापर्यंत उघड्यावर विक्रेत्यांनी मासे विक्री करू नये, अशा सूचना संबंधितांनी देणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने याबाबत दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी रास्त अपेक्षा परिसरातील जागरुक आणि सुज्ञ नागरिकांनी केली आहे.