आगीत गृहोपयोगी लाखोंचे साहित्याचे नुकसान
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
शहरातील शास्त्री नगर भागातील बंद घराला घरातील देव्हाऱ्यासमोर लावलेल्या दिव्यामुळे आग लागून गृहोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. आगीमुळे लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. आगीचे वृत्त कळताच घटनास्थळी अग्निशामक दलाच्या जवानांनी धाव घेत तात्काळ आग आटोक्यात आणली. खुशालसिंग पवार यांच्या घराला लागलेल्या आगीत संपूर्ण गृहोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. पवार यांनी अंदाजे लाखोंचे नुकसान झाले असल्याचे सांगितले. संबधित विभागाने तात्काळ पंचनामा करून कुटुंबाला नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
सविस्तर असे की, जामनेर शहरातील शास्त्री नगर भागातील रहिवासी खुशालसिंग दावलसिंग पवार हे आपल्या कुटुंबासोबत बाहेर गेले होते. बंद घरातील देव्हाऱ्यासमोर लावलेल्या दिव्यामुळे घराला अचानक आग लागून घरातील गृहोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. आगीत घरातील गृहोपयोगी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याचे चित्र पहायला मिळाले. अचानक लागलेल्या आगीमुळे आजूबाजूच्या रहिवाश्यांनी धाव घेत आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु आग आटोक्यात येत नसल्याने नागरिकांनी घटनेची माहिती जामनेर नगर पालिकेच्या अग्नीशामक दलाला दिली.
घटनेचे गांभीर्य ओळखून अवघ्या काही मिनिटांत अग्नीशामक दल घटनास्थळी दाखल झाले. अग्नीशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली.