साईमत, जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील नेरी दिगर येथे इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरला शॉर्टसर्किटमुळे बाजूच्या बंद घराला आग लागली. घरात कोणीही नसल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, आग लवकर आटोक्यात आल्यामुळे सुप्रीम कंपनी व सुरक्षा फायर टीमचे नेरी ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.
घटनेची माहिती उपसरपंच प्रकाश बोरसे यांना मिळताच त्यांनी तात्काळ गाडेगाव येथील सुप्रीम कंपनीच्या श्री.जेहुरकर यांना संपर्क केला. तेव्हा त्यांनी तात्काळ आपल्या फायर टीमला घटनास्थळी पोहचण्याच्या सूचना केल्या. त्यावर सुरक्षा अधिकारी दत्तात्रय गिरी यांच्या मार्गदर्शनखाली सुरक्षा अधिकारी परमेश्वर पाटील स्वतः त्यांची फायर टीम घेऊन व पाण्याचे टँकर घेऊन आग विझविण्यासाठी धावून आले. त्यांच्या मदत कार्यामुळे आग आटोक्यात आली. आग विझविण्यात टीमला अथक प्रयत्नानंतर यश आले. त्यामुळे नेरी येथील मोठी दुर्घटना टळली. यावेळी सुप्रीम कंपनीचे कॉन्ट्रॅक्टर कमलाकर पाटील आणि नेरी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.