“स्कार्फ अडकून ४५ वर्षीय कामगार महिलेची प्राणज्योत गेली”
साईमत जळगाव प्रतिनिधी,:
जळगाव एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत काम करत असताना ४५ वर्षीय जमुना रामकरण पाटील (रा. जामोद, जि. खंडवा, मध्य प्रदेश) या महिलेचा मशीनमध्ये स्कार्फ अडकल्यामुळे झालेल्या गंभीर जखमेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
जमुना पाटील आणि त्यांचे पती रामकरण पाटील हे एमआयडीसीमधील ‘डी-६’ सेक्टरमधील आर.सी. फूड कंपनीत काम करीत होते. १७ मार्च रोजी नेहमीप्रमाणे काम करत असताना जमुना यांच्या गळ्यातील स्कार्फ अचानक मशीनमध्ये अडकला. स्कार्फसह त्यांच्या केसाही मशीनमध्ये ओढले गेले, ज्यामुळे त्यांच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर जमुनाला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र प्रकृती अधिक बिघडल्याने २० मार्च रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यू नंतर त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी मध्य प्रदेशातील मूळ गावी नेण्यात आला.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ‘अकस्मात मृत्यू’ नोंद करण्यात आली आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश शिरसाळे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. कंपनीकडून आणि संबंधित प्रशासनाकडून सुरक्षा उपाययोजना सुधारण्याची गरज असल्याचे स्पष्ट होत आहे, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारचे अपघात टाळता येतील.
