पुलाच्या बांधकामासाठी केलेल्या खड्ड्यात शेतकऱ्याचा बुडून मृत्यू

0
27

जळगाव तालुक्यातील कडगावातील घटना, मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा नातेवाईकांनी घेतला पवित्रा

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

म्हशी चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा पुलाच्या बांधकामासाठी केलेल्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील कडगाव येथे घडली आहे. संतोष यादव धनगर (वय ५५, रा.कडगाव, ता. जळगाव) असे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे काम अपूर्ण राहिल्याने ग्रामस्थांनी ही घटना घडल्याचा संताप व्यक्त केला आहे. जोपर्यंत ठेकेदारावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. यासंदर्भात नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सविस्तर असे की, कडगाव येथील रहिवाशी संतोष धनगर हे नेहमीप्रमाणे दुपारी म्हशी चारण्यासाठी गेले होते. त्यानंतर सायंकाळी परत येत असताना जोगलखेडा ते कडगाव रस्त्यावरील पुलाचे काम करण्यासाठी केलेल्या खड्ड्यात त्यांच्या म्हशी गेल्या होत्या. पाण्यात गेलेल्या म्हशी या गाळात बसल्याने त्यांना काढण्यासाठी संतोष धनगर हे गेल्यावर त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

काम अपूर्ण ठेवल्यामुळे एकच संताप

रस्त्याने गावातील ग्रामस्थ ये-जा करत असताना ही घटना त्यांच्या लक्षात आली. त्यामुळे गावातील ग्रामस्थ एकत्र येऊन संतोष धनगर यांना खड्ड्यातील पाण्यातून बाहेर काढले. यावेळी संबंधित ठेकेदाराने हे काम अपूर्ण ठेवल्यामुळे एकच संताप व्यक्त केला होता. जोपर्यंत संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा नातेवाईकांसह ग्रामस्थांनी घेतला होता. या घटनेबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मयताच्या पश्चात पत्नी मालती, मुलगा जयेश असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here