साईमत, शहादा । प्रतिनिधी
तालुक्यातील होळमोहिदा येथे शेतातील बंद घर फोडून चोरट्यांनी घरातील सामान शेजारी असलेल्या केळीच्या शेतात नेऊन अस्ताव्यस्त फेकून दिले. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. ग्रामीण भागात चोरट्यांनी मोर्चा वळविल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. शहादा पोलिसांकडून घटनास्थळी पाहणी करण्यात आली.
होळमोहिदा शिवारात उंटावद-आवगे-जुनवणे रस्त्यावर मोहन गुलाल पाटील यांचे घर आहे. दोन दिवसांपासून मोहन पाटील कुटुंबीयांसह पुणे येथे गेले होते. रस्त्यालगतच शेत असल्याने त्यांनी तेथेच घर बांधले आहे. कुलूप लावून ते पुणे येथे गेले होते. दरम्यान, श्री. पाटील गावाला गेल्याची संधी साधून चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री घराच्या मागील दरवाजा तोडून घरात प्रव्ोश केला व कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकून दिले. घरातील कपाट व तत्सम वस्तू घराला लागून असलेल्या शेतात फेकून दिल्या. शुक्रवारी सकाळी या मार्गाने जाणाऱ्यांना घर उघडे असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी श्री. पाटील यांना माहिती दिली. त्यांनी तातडीने पुण्याहून शहाद्याकडे धाव घेतली. दरम्यान, याबाबत पोलिसात माहिती देण्यात आल्यानंतर शहादा पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
घरातील कपाट व इतर सामान घरालगत असलेल्या केळीच्या शेतात अस्ताव्यस्त फेकून देण्यात आल्याचे पोलिसांना निदर्शनास आले. दुपारी श्वानपथक बोलावण्यात आले, तर ठसे तज्ज्ञांनी ठसे घेतले. या घटनेत चोरट्यांनी घरफोडी केली असली, तरी घरातील सामान अस्ताव्यस्त फेकून देण्याव्यतिरिक्त चोरट्यांच्या हाती काहीही न लागल्याने चोरटे रिकाम्या हाती पसार झाल्याची चर्चा आहे.