मार्केटमध्ये पसरले दहशतीचे वातावरण, वादामुळे व्यापाऱ्यांनी केली दुकाने बंद
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील गोलाणी मार्केटमध्ये चष्मा घेण्यासाठी आलेल्या ग्राहक आणि दुकानदारात वाद उफाळल्याची घटना सोमवारी, ९ जून रोजी दुपारी घडली. हा वाद विकोपाला गेल्यामुळे व्यापाऱ्यांना आपली दुकाने बंद करण्यास भाग पाडले. अशा सर्व प्रकारामुळे गोलाणी मार्केटमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या गोलाणी मार्केटमध्ये दिनेश निलेश चौधरी हा तरुण मोबाईल रिपेअरिंग करण्यासाठी आला होता. मोबाईल रिपेरिंग झाल्यानंतर तो चष्मा घेण्यासाठी शाहरुख शेख अक्तर या दुकानदाराकडे गेला. दरम्यान, चष्म्याच्या किंमतीवरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने व्यापाऱ्यांनी एकामागे एक आपली दुकाने बंद केली. तसेच घटनेत व्यापारी आणि वाद झालेल्या ग्राहकामध्ये हाणामारी झाली. त्यात काही जण जखमी झाले आहे.
अर्धा तास सुरु होता वाद
हा वाद जवळपास अर्धा तास सुरु राहिल्याने मार्केटमधील बहुतांश दुकाने बंद झाली होती. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी गोलाणी मार्केटमध्ये गर्दी केल्याचे दिसून आले. दरम्यान, गोलाणी मार्केटमध्ये अनेकवेळा अशा प्रकारचे वाद उद्भवतात. त्यामुळे पोलिसांसह मनपानेही याठिकाणी उपाययोजना कराव्यात, अशी सूज्ञ नागरिकांनी मागणी केली आहे.