७८ विद्यार्थी, ६० दिवस : विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास दुपटीने वाढला
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील सानेगुरुजी कॉलनीतील स्थित कै. सुनीता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कुलमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी १ जुलै ते १ सप्टेंबर या कालावधीत ६० दिवसांचा इंग्रजी अभ्यास उपक्रम राबविण्यात आला. उपक्रमात दहावीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. उपक्रमात यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. शाळेचा स्तुत्य उपक्रम विद्यार्थ्यांसाठी ‘इंग्रजीचा’ दरवाजा उघडणारा ठरला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास दुपटीने वाढल्याचा उपक्रमातून सूर उमटला
बोर्डाच्या परीक्षेसाठी अत्यावश्यक असलेल्या रायटिंग स्किल्स व सुंदर लिखाणाच्या सरावावर उपक्रमात विशेष भर देण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी दररोज उपस्थित राहून उत्साहाने उपक्रम पूर्ण केला. अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची इंग्रजी विषयावरील भीती दूर झाली, चुका लक्षात आल्या, आत्मविश्वास वाढला. तसेच लेखनकौशल्य अधिक सक्षम झाले. उपक्रमात प्रथम क्रमांक दीपाली गोरख इंगळे, द्वितीय क्रमांक प्रिती तुषार शिंपी तर तृतीय क्रमांक गोपाल तुळशीराम चिम तसेच उत्तेजनार्थ बक्षीस गितेश ईश्वर पवार याला देण्यात आले.
आमचे आदर्श शिक्षक किरण पाटील आणि किशोर पाटील यांनी आम्हाला ६० दिवस मार्गदर्शन केले. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षेला निश्चितच आम्हाला मोठा फायदा होणार असल्याचे दीपाली इंगळे ह्या विद्यार्थिनीने अनुभव व्यक्त करताना सांगितले. उपक्रमाला इंग्रजी शिक्षक किरण पाटील, किशोर पाटील यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांसह मार्गदर्शकांचे शाळेचे मुख्याध्यापक एस. पी. निकम, उपमुख्याध्यापक जे. एस. चौधरी, पर्यवेक्षक के. आर. पाटील, ज्येष्ठ कला शिक्षक एस. डी. भिरुड तसेच संगीता पाटील, नरेश फेगडे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.