चिंचखेड्यातील चिमुकलीवर अत्याचार करून हत्या

0
53

साईमत, जामनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील केकतनिंभोरा जवळील चिंचखेडा बु. शिवारात चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची अत्यंत ह्दयद्रावक घटना मंगळवारी, ११ जून रोजी घडली. घटनेनंतर संशयित आरोपी फरार झाला असून जामनेर पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. दरम्यान, याघटनेबाबत केकतनिंभोरा, चिंचखेडा बु. सह जिल्ह्याभरातून हळहळ व्यक्त होत आहे.

सविस्तर असे की, चिंचखेडा बु. गावाजवळ काही आदिवासी कुटुंब झोपड्या करून राहतात. मोलमजुरी करुन ते आपला उदरनिर्वाह करतात. सध्या खरीपाच्या पेरणीचे दिवस असल्याने अंदाजे ६ वर्षीय अल्पवयीन चिमुकलीला घरी ठेवून मुलीचे आई-वडील कामानिमित्त शेतात गेले होते. चिमुकली घरी एकटीच असल्याचा फायदा घेत शेजारीच राहत असलेला एक ३५ वर्षीय नराधम त्या अल्पवयीन चिमुकलीला खाऊ देण्याच्या बहाण्याने सोबत घेऊन गेला. दुकानातून काही खायची वस्तू घेऊन त्या चिमुकलीला गोड बोलून चिंचखेडा बु. गावाजवळील एका केळीच्या शेतात नेऊन तिच्यावर अमानुष अत्याचार केला. चिमुकलीला जीवे ठार मारुन पुरावे नष्ट केल्याची घटना उघडकीस आली. ही घटना ११ जून रोजी सायंकाळी उघडकीस आली आहे.

पीडित चिमुकलीचे आई-वडील सायंकाळी कामावरुन घरी आल्यावर घरात चिमुकली दिसून आली नाही. म्हणून त्यांनी आसपासच्या शेजाऱ्यांना विचारपूस केली. मात्र, चिमुकली सापडली नाही. तेव्हा त्यांनी ग्रामस्थांना ही घटना सांगितली तेव्हा ग्रामस्थांनी सर्वदूर शोध घेतल्यावर ती एका केळीच्या मळ्यात मृतावस्थेत आढळून आली. ग्रामस्थांनी तातडीने जामनेर पोलीस स्टेशनला घटनेविषयी सविस्तर माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत सविस्तर माहिती जाणून घेत मृत चिमुकलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जळगाव येथे पाठविला. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. घटनेनंतर पोलिसांनी अधिक तपास केल्यावर याच वस्तीतील सुभाष इमाजी भील (वय ३५, मूळ गाव वावडदा, बिलवाडी) ही व्यक्ती बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. चिमुकलीचा मृतदेह व घटनास्थळ बघितल्यावर मयत चिमुकलीवर अत्याचार करुन तिला मारुन टाकले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.

नराधमाला कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणार : खा.स्मिताताई वाघ

जळगाव जिल्हा रुग्णालयात त्या चिमुकलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आल्यावर खा.स्मिताताई वाघ यांनी घटनेची माहिती जाणून घेऊन दुःख व्यक्त केले. याप्रकरणी नराधमाला कठोर कारवाई व्हावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही घटना वेदनादायी आहे. त्यामुळे मला तातडीने कळल्यावर भेट देण्यास आल्याचे सांगितले. पोलीस संशयित आरोपीचा शोध घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here