साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कार्यालय होणे सोपे नाही. आ. मंगेश चव्हाण कुठलेही काम हाती घेतल्यावर पूर्ण करतात. त्यामुळे ते तालुक्याचा विकास करीत आहेत. त्यांनी सतत पाठपुरावा करून कार्यालयाचे काम मंजूर करून आणले. त्यामुळेच दूरदृष्टी असलेला आमदार आणि नेता तालुक्याला लाभला आहे. ‘अशक्य’ हा शब्द आ.मंगेश चव्हाण यांना माहित नाही. त्यामुळेच आठवड्याभरात त्यांनी आरटीओ कार्यालय सुरु करून दाखविले, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांनी केले. आ.मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांनी मंजूर झालेल्या येथील महात्मा फुले कॉलनीतील शहीद हेमंत जोशी क्रीडांगण येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि नवीन वाहनांना एमएच ५२ नोंदणी शुभारंभासह विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
चाळीसगाव येथे आयोजित सोहळ्याला पालकमंत्री गुलाबराव पाटील, आ.राजूमामा भोळे, आ.किशोर पाटील, आ.संजय सावकारे, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, जिल्हा बँक चेअरमन संजय पवार, माजी आमदार साहेबराव घोडे, भाजपा प्रदेश उपाध्यक्षा स्मिता वाघ, शेंदुर्णीचे संजय गरुड, दूध संघाचे संचालक रोहित निकम, पारोळाचे माजी नगराध्यक्ष करण पवार, मधुकर काटे, अमोल पाटील यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, दळवळण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यानिमित्त मंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात दोन वाहन धारकांना एमएच ५२ नंबरची पासिंगची नोंदणी देण्यात आली.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय चाळीसगाववासियांना अर्पण : आ.मंगेश चव्हाण
चाळीसगाव तालुक्यासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. राज्यात नव्हे तर देशभरात एमएच ५२ ही आपली वेगळी ओळख निर्माण होणार आहे. भारतीय जनता पक्षाने संधी दिली. ना.गिरीष महाजन यांनी विश्वास दाखविला. तसेच चाळीसगाव तालुक्याच्या जनतेने आशीर्वाद दिले म्हणून मी हे काम करू शकत आहे. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय चाळीसगाववासीयांना नम्रपणे अर्पण करत असल्याचे आ.मंगेश चव्हाण यांनी सांगितले.
चाळीसगाव तालुक्यात आज एकाचवेळी चाळीसगाव शहरातील महापुराचे प्रमुख कारण असलेल्या हॉटेल दयानंद जवळील तितुर नदीवरील नवीन पुलाचे भूमिपूजन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून मंजूर केलेल्या मोदी आवास योजनेतील भटक्या व विमुक्त जाती प्रवर्गासाठीच्या महाराष्ट्रातील पहिल्या २५९ घरांच्या वसाहतीचे बोढरे येथे भूमिपूजन, तालुका क्रीडा संकुल येथे नूतनीकरण व अद्ययावतीकरण आदी कामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. चाळीसगाव तालुक्यातील २०२१ मधील महापूरग्रस्तांना सहा कोटींची मदत मिळाली आहे. दुष्काळग्रस्तांसाठी १३३ कोटी २३ लाख रुपये मंजूर झाले आहेत. लवकरच ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील, असेही आ.चव्हाण यांनी सांगितले.
तालुक्याला विकासाच्या उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न
चाळीसगाव हा जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका व तिसऱ्या क्रमांकाचे शहर मात्र साधी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत नव्हती, नाट्यगृह नव्हते. आज चाळीसगाव शहरात मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पंचायत समिती, कोर्ट, उत्पादन शुल्क, नाट्यगृह, रेस्ट हाऊस, पोलीस हाऊसिंग आदी इमारतींचे काम सुरु आहे आणि काही काम पूर्णही झाले आहेत. पदापेक्षा कामात जास्त विश्वास ठेवणारा मी कार्यकर्ता आहे. चाळीसगाव तालुक्याला विकासाच्या उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही आ.चव्हाण यांनी सांगितले.