मंत्री छगन भुजबळांवर गुन्हा दाखल करुन पदाचा राजीनामा घ्यावा

0
9

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

राज्याचे मंत्री ना.छगन भुजबळ यांना राज्यपालांनी संवैधानिक शपथ देतांना आणि शपथ घेतांना समाजात कोणत्याही प्रकारचा जातीभेद करणार नाही किंवा कोणाशी वैरभावाने वागणार अथवा वावरणार नाही. मग ना.भुजबळ मराठा समाजाबद्दल कसे काय बोलले? ते व्यक्ती द्वेषाने वागु शकतात. त्यामुळे भुजबळांनी विधानसभा सदस्य व मंत्रीपदाच्यावेळी घेतलेल्या संवैधानिक शपथेची पायमल्ली (उल्लंघन) केल्याचा गुन्हा दाखल व्हावा, त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी ७ नोव्हेंबर रोजी सकल मराठा समाजाच्यावतीने चाळीसगावचे तहसीलदार, शहर पोलीस निरीक्षक यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्र्यांकडे केली आहे.

मराठा योध्दा मनोज जरांगे-पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजाला कुणबी मराठा आरक्षण मिळावे म्हणून आपल्या जिवाची पर्वा न करता जिवाची बाजी लावून आमरण उपोषण केले. आरक्षणावर मार्ग काढण्यासाठी सरकारने त्यांच्याकडे दोन महिन्यांचा कालावधी मागून घेतला. त्यामुळे जरांगे-पाटील यांनी सरकारचा मान राखून आमरण उपोषण मागे घेतले. साखळी उपोषण सुरू ठेवावे, असे मराठा समाजाला जाहीर आवाहन केलेले आहे. त्यामुळे बहुतेक ठिकाणी अद्यापही साखळी उपोषण सुरू आहे. अशा कठीण परिस्थितीत मंत्री छगन भुजबळ यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ही कथीत क्लिप अनेक इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून प्रसारित झालेली आहे. छगन भुजबळ हे या क्लिपमध्ये संभाषण करताना आपल्या एका कार्यकर्त्याशी बोलताना म्हणाले की, ‘त्यांचे बुलडोझर सुरू झाले. आता सर्वांना उभे रहावे लागेल, तो कार्यकर्ता म्हणतो की, साहेब आम्ही आपल्या पाठीशी… ते एक, एक करून ओबीसीमध्ये घुसताय… भुजबळांना तो म्हणतो की, साहेब आपण निर्णय घ्या आम्ही तुमच्या बरोबर आहे. भुजबळ म्हणतात, मी आता उभा रहातोय करेंगे या मरेंगे’ अशी भाषा वापरली आहे. एका संवैधानिक पदावर असणारा आमदार, मंत्री अशी हिंसेची भाषा वापरून एक प्रकारे भुजबळ हे दोन समाजात सामाजिक भेद आणि तेढ निर्माण करून समाजात अशांतता पसरविण्याचे काम जाणीवपूर्वक करीत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

निवेदनावर गणेश पवार, प्रशांत गायकवाड, खुशाल पाटील, मनोज भोसले, सुनील चव्हाण, साहेबराव काळे, बाजीराव दौंड, भिकन निकुंभ, दिलीप पाटील, शिवाजी पाटील, राजेंद्र पाटील, रणधीर जाधव, सागर चौधरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here