साईमत जळगाव प्रतिनिधी
शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉप जवळ खान्देश सेंट्रल परिसरात असलेल्या संत बाबा हरदासराम कॉम्प्लेक्समध्ये दुकाने खरेदीसाठी जळगावातील दोन व्यापारी भावंडांनी ३ कोटी ७३ लाख रुपये दिले होते. अनेक वर्ष होऊनही दुकाने मिळत नसल्याने तसेच दिलेली रक्कमही परत न दिल्याने शहर पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या फिर्यादीवरून बांधकाम व्यावसायिक साहित्या परिवारातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, शहरातील फुले मार्केटमध्ये महेंद्र रोशनलाल नाथानी (५०) व त्यांचे भाऊ आनंद नाथानी यांचे कपड्याचे दुकान आहे. महात्मा फुले मार्केटमधील गाळ्यांचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने ते दुसरीकडे दुकान घेण्याच्या विचारात होते. एका कार्यक्रमात त्यांची बांधकाम व्यवसायिक खुबचंद साहित्या यांच्याशी भेट झाली असता त्यांनी त्यावर चर्चा केली. साहित्या यांनी गोविंदा रिक्षा थांब्याजवळ बांधण्यात येणाऱ्या संत बाबा हरदासराम कॉम्प्लेक्स या व्यापारी संकुलाच्या जागेचा सातबारा उतारा नाथानी यांना दाखवला. ही जागा मुंबई येथील राजमुद्रा रिअल इस्टेट प्रा.लि.च्या मालकीची असून त्यांनी जागा खरेदीविषयी आपल्या कंपनीशी सौदापावती झाली असून तेथे व्यापारी संकूल बांधून दुकान विक्री करणार असल्याचे सांगितले.
महेंद्र रोशनलाल नाथानी (५०) व त्यांचे भाऊ आनंद नाथानी या दोन्ही भावंडांना दुकाने घ्यायची असल्याने त्यानुसार त्यांनी खुबचंद साहित्या, अनिल साहित्या, ममता साहित्या व नितीन साहित्या यांची भेट घेऊन दुकान घेण्यासाठी तयारी दर्शवली. बैठकीत नाथानी यांना साहित्या यांनी सौदापावती करारनामा तसेच प्रस्तावित व्यापारी संकुलाचा नकाशा दाखवला. संपूर्ण दुकानाचा व्यवहार सवलत वजा करता ६ कोटी ६० लाखात थराला होता. व्यवहाराच्या ५० टक्के रक्कम जमा करायची होती. ठरल्यानुसार नाथानी यांनी दि.५ डिसेंबर २०१७ रोजी के.पी. इन्फ्रास्ट्रक्चरच्या खात्यावर १० लाख रुपये पाठवले. त्यानंतर नाथानी बंधूंनी वेळोवेळी एकूण ३ कोटी ७३ लाख रुपये दिले.
अर्धी रक्कम दिल्यानंतर देखील साहित्या यांच्याकडून सौदापावती करून देण्याचे टाळण्यात येत होते. नाथानी यांनी व्यवहार पूर्ण करण्याविषयी वारंवार तगादा लावूनही उपयोग होत नसल्याने ते हताश झाले होते. नाथानी हे ९ फेब्रुवारी २०२४ रोजी साहित्या यांच्या कार्यालयात गेले असता त्यावेळी संस्थेचा शिक्का असलेली तोंडी सौदापावती असे अपूर्ण कागदपत्रे त्यांनी दिले. सौदा पावतीची मुदत संपल्यावर दुकाने साहित्या यांनी दुसऱ्याला विकल्याची माहिती नाथानी यांनी दुय्यम निबंधक कार्यालयातून मिळवली असता ही बाब खरी निघाली. नाथानी यांनी विचारणा केली असता साहित्या यांनी शिवीगाळ करत ‘तुझे पैसे देत नाही, तुझे दुकान मी दुसऱ्याला विकून टाकले’, ‘जा तुझ्याकडून जे होईल ते करून घे’ असे सांगत बाहेर काढून दिले.
याप्रकरणी महेंद्र रोशनलाल नाथानी यांनी शनिवार, दि.२ मार्च रोजी रात्री शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून बांधकाम व्यावसायिक खुबचंद प्रेमचंद साहित्या (५६), अनिल प्रेमचंद साहित्या (४८), ममता अनिल साहित्या (४६) व नितीन खुबचंद साहित्या (३६) सर्व रा. मोहाडी रोड, जळगाव या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.