साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
शहरातील कोतकर कॉलेजजवळ पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड हे रविवारी, ८ ऑक्टोबर रोजी पहाटे शासकीय वाहनाने गस्त करीत असतांना एक पांढऱ्या रंगाची हुंडाई कार (क्र. एमपी ०९ डब्ल्यूसी १४८५) हिच्यावर संशय आला. त्यानंतर त्यांनी कार चालकास थांबण्याचा इशारा दिला. मात्र, त्याने इशाऱ्याला न जुमानता भरधाव वेगाने कार नेली. गस्तीवरील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी तात्काळ एकमेकांना संपर्क करून चाळीसगाव शहरातील मुख्य रस्त्यावर येऊन कार अडविण्याचा प्रयत्न केला. वाहन चालकास पळून जाण्यासाठी मार्ग न मिळाल्याने तो वाहन रेल्वे स्टेशन जवळील मालधक्क्याजवळ सोडून पळून गेला. कार चालकाच्या बाजुस असलेल्या मागील दरवाजाच्या फुटलेल्या काचमधुन पाहिल्यावर कारमध्ये गोण्या व गोण्यांच्या बाजुला अफुची बोंडे व बोंडाचा चुरा आढळून आला. याप्रकरणी कारसह २८ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करुन चाळीसगाव शहर पो.स्टे. ला कारचालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
घटनेची माहिती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळताच सहा. पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांची लेखी परवानगी घेऊन तसेच लागलीच पोलिसांनी दोन शासकीय पंच, वजन मापे निरीक्षक असे पोलीस स्टेशनला बोलावून पोलिसांचे एक पथक तयार केले. कारमधील मुद्देमालाची पाहणी केल्यावर त्यात १ क्विंटल, ८० किलो, २४० ग्रँम वजनाच्या १८ लाख २ हजार ४०० रुपये किमतीच्या ९ गोण्यात अफुची बोंडे व बोंडाचा चुरा (अमली पदार्थ) तसेच १० लाख रुपये किमतीची एक पांढऱ्या रंगाची हुंडाई कंपनीची क्रेटा कार असा २८ लाख २ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी शासकीय पंचासमक्ष जप्त करुन ताब्यात घेतला आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप पाटील तसेच स.पो.नि. सागर ढिकले, पो.उप.नि. सुहास आव्हाड, योगेश माळी, चालक पो.हे.कॉ.नितीन वाल्हे, राहुल सोनवणे, विनोद भोई, सुभाष घोडेस्वार, पंढरीनाथ पवार, पो.ना.महेंद्र पाटील, भूषण पाटील, तुकाराम चव्हाण, दीपक पाटील, पो.कॉ.ज्ञानेश्वर पाटोळे, विजय पाटील, पवन पाटील, आशुतोष सोनवणे, समाधान पाटील, रवींद्र बच्छे, राकेश महाजन, ज्ञानेश्वर गिते, विनोद खैरनार, निलेश पाटील, शरद पाटील, प्रवीण जाधव, संदीप पाटील (सर्व चाळीसगाव शहर पो.स्टे) तसेच फोटोग्राफर अनिकेत जाधव, वजन मापाडी अक्तर युनुस छुटाणी (रा. चाळीसगाव) आणि पंच संजय चव्हाण, विनोद मेन यांनी संयुक्त अभियान राबवून केली. तपास पी.एस.आय. सुहास आव्हाड, पो.हे.कॉ.विनोद भोई, पो.कॉ.उज्ज्वलकुमार म्हस्के करीत आहेत.