मुख्याध्यापकाला दहा हजारांची लाच भोवली 

0
27

साईमत/ न्यूज नेटवर्क । जळगाव ।

प्रलंबित वेतन निश्‍चितीची रक्कम मिळवून देण्याच्या मोबदल्यात तडजोडीअंती दहा हजारांची लाच मागून स्वीकारताना एरंडोल तालुक्यातील निपाणे येथील श्री संत हरिहर माध्यमिक हायस्कुलच्या मुख्याध्यापकाला जळगाव एसीबीने बेड्या ठोकल्या आहेत. संदीप प्रभाकर महाजन (वय ४४) असे लाचखोर मुख्याध्यापकाचे नाव आहे.

निपाणेतील श्री संत हरिहर हायस्कुलमध्ये ३३ वर्षीय तक्रारदार शिपाई आहेत. त्यांच्या मागील प्रलंबित वेतन निश्‍चितीच्या फरकाची रक्कम दोन लाख ५३ हजार ६७० रुपये मंजूर करण्याचा प्रस्ताव वेतन अधीक्षक, माध्यमिक शिक्षण विभाग जळगाव यांच्याकडे पाठविण्यात आला. प्रस्ताव मंजुरीचे काम आरोपी महाजन यांनी स्वतःच्या ओळखीने करून दिले होते. त्याचा मोबदला म्हणून मंजुर रकमेच्या पाच टक्क्याप्रमाणे १२ हजार पाचशे रुपये लाचेची मागणी मुख्याध्यापक यांनी २५ जून रोजी केली. त्याबाबत तक्रार नोंदविण्यात आली. पडताळणीत तडजोडीअंती दहा हजार रुपयांची लाच स्वीकारण्याचे मुख्याध्यापकाने मान्य केल्यानंतर गुरुवारी, २७ जून रोजी सापळा रचण्यात आला. लाच घेताना शाळेत रंगेहाथ पकडले. गुरुवारी दुपारी मुख्याध्यापकाला लाचेची रक्कम तक्रारदार शिपाई यांच्याकडून घेताच एसीबीने ताब्यात घेतल्याने शाळेच्या वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

यांनी केला सापळा यशस्वी 

हा सापळा जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पीएसआय दिनेशसिंग पाटील, पोलीस नाईक बाळू मराठे आदींनी यशस्वी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here