३९ उमेदवारांची यादी जाहीर
साईमत/मुंबई/प्रतिनिधी :
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. जागावाटपाच्या मुद्द्यावरून अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या ओढाताणीनंतर, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) ने महायुतीला मोठा धक्का दिला आहे. भाजपने आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी विश्वासघात केल्याचा आरोप करत आठवले यांनी मुंबईत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असून ३९ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे.
जागावाटपाच्या चर्चेत रिपाईला सात जागा देण्याचे आश्वासन महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आले होते. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली असतानाही महायुतीने जाहीर केलेल्या याद्यांमध्ये रिपाईच्या एकाही उमेदवाराला स्थान देण्यात आले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कोट्यातून जागा देण्याचे निर्देश दिले होते, तरीही प्रत्यक्षात कोणतीही हालचाल न झाल्याने रामदास आठवले यांनी संताप व्यक्त केला आहे. “आमच्याशी विश्वासघात झाला असून, आता स्वबळाशिवाय पर्याय नाही,” अशा स्पष्ट शब्दांत आठवले यांनी आपली भूमिका मांडली.
मुंबईतील अनेक वॉर्डांमध्ये आंबेडकरी मतदारांची संख्या निर्णायक आहे. आतापर्यंत हा मतदार रामदास आठवले यांच्या आवाहनामुळे महायुतीच्या पाठीशी उभा राहत होता. मात्र, आता रिपाईने स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवल्याने दलित मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अटीतटीच्या लढतीत १०० ते २०० मतांचा फरकही उमेदवाराचे भवितव्य ठरवू शकतो. अशा स्थितीत रिपाईच्या या निर्णयामुळे भाजप आणि शिंदे गटाच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची चिन्हे आहेत.
रामदास आठवले यांनी जाहीर केलेल्या ३९ उमेदवारांच्या यादीत मुंबईच्या विविध भागांतील महत्त्वाच्या वॉर्डांचा समावेश आहे. रिपाईच्या या अनपेक्षित निर्णयामुळे महायुतीच्या गोटात खळबळ माजली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मित्रपक्ष दुरावणे महायुतीला परवडणारे नाही. आता भाजपचे वरिष्ठ नेते रामदास आठवले यांची मनधरणी करण्यात यशस्वी होतात की रिपाई आपल्या निर्णयावर ठाम राहून महायुतीला निवडणुकीत ‘रिटर्न गिफ्ट’ देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
