साईमत, बागलाण: प्रतिनिधी
शेतीची कामे आटोपून विश्रांती घेण्यासाठी दुपारच्या सुमारास घराकडे शेतकरी परतले. याचवेळी एक भला मोठा नाग कांदाचाळीत शिरताना घरातल्या एका लहानग्यास दिसला. त्याच्या ओरडण्याने सर्वांची धांदल उडाली.
देवळाणे (ता.बागलाण) येथील शेतकरी महेंद्र काशिनाथ देवरे हे आपल्या कुटुंबासह पाटी शिवारातील (गट क्र.161) मध्ये राहतात. सकाळपासून देवरे कुटुंबिय शेतातील कामात व्यस्त होते. दरम्यान दुपारच्या सत्रात विश्रांतीसाठी शेतातील घरात बसले असता महेंद्र देवरे यांचा दुसरीत शिक्षण घेत असलेला मुलगा घराजवळील ट्रॅक्टरवर खेळत होता. अचानक त्याचे सळसळत जाणाऱ्या भल्या मोठ्या सापाकडे लक्ष गेले व लागलीच कुटुंबातील सदस्यांना आवाज देऊन माहिती दिली. कुटुंबियांनी धाव घेतली तोच नागोबाने शेजारील कांदा चाळीत शिरकाव केला. देवरे कुटुंबीयातील सदस्यांनी आजूबाजूला असलेल्या शेतकऱ्यांना आवाज दिला तोपर्यंत नागोबाने कांदा चाळीचा ताबा घेतला होता. नागोबाचे रौद्र रूप पाहून एकाचीही हिमंत होत नव्हती जमलेल्या शेतकऱ्यांतील एकाने सर्पमित्राला पाचारण केले होते.काही व्ोळातच सर्पमित्र दाखल झाले त्यांनी कांदा चाळीवरील फ्लॉस्टिक कागद अलगद बाजूला केला आणि चाळीतील कांद्यावर डुलत असलेल्या नागोबाला पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले. अखेरीस सर्पमित्राने मोठी कार्यकुशलता दाखवत पकडण्यात यश मिळवले. सर्पमित्राने नागोबाला त्याच्या आधिवासात सुखरूप सोडले आणि देवरे कुटुंबीयांसह उपस्थित शेतक-यांनी निश्वास सोडला.