रायपूर ः
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाली आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल बिलासपूरमध्ये पत्रकारांना माहिती देत असताना अचानक साप त्यांच्या पायापर्यंत आला. यावेळी त्यांच्याभोवती पत्रकारांचा गराडा होता तसेच त्यांचे सुरक्षा रक्षकही होते. सापाला पाहताच तिथे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये एकच खळबळ उडाली.यावर मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांचे उत्तर हैराण करणारे होते.
पत्रकारांशी बोलत असताना मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या चक्क पायापर्यंत साप आला. यावर भूपेश बघेल यांनी दिलेले उत्तर ऐकून सर्वच आश्चर्यचकित झाले. सापाला घाबरण्याचे कारण नाही, मी लहानपणापासून खिशात साप घेऊन फिरतो,असे मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले. इतकेच नाही तर सापाला मारू नका असा सल्लाही त्यांनी दिला. सापाला सुरक्षित जाऊ देण्याचे आदेश त्यांनी सुरक्षा रक्षकांना दिले.
सप्टेंबर महिन्यात काँग्रेस नेते राहुल गांधी छत्तीसगड दौऱ्यावर येणार आहेत. याची तयारी सुरु असल्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सांगितलं. राहुल गांधी यांच्या दौऱ्यात कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा आयोजित केला जाणार आहे. यात लाखो कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.