चोपडा – शहरात दुचाकी वाहन धारकांची संख्या कमालीची वाढली असून, दुचाकी वाहनांमध्ये मॉडिफिकेशन करून, जास्त आवाजाचे सायलेन्सर आणि कर्णकर्कश हॉर्न बसवून चोपडा शहरात सुसाट वेगात फेरफटका मारण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. हॉस्पिटल्स, शाळा, महाविद्यालये तसेच इतर शांत व सार्वजनिक ठिकाणी या सायलेन्सर व हाॕर्नमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होते, शिवाय अनेकांना विनाकारण त्रासही होतो. बुलेटवरून हवा करत फिरणाऱ्या अशाच अतिउत्साही युवकांची हवा काढण्याची कारवाई चोपडा वाहतूक शाखेच्या पोलिसांनी करावी हिच सर्वसामान्यांची अपेक्षा.आता तर चक्क तहसील कार्यालय व शहर तसेच ग्रामीण पोलिस स्टेशनच्या बाहेरील रस्त्यावरच या गाड्या फेरफटका मारत असतात. छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात असलेल्या पोलीस चौकीसमोरुन जात असतात परंतु अशा वाहनांवर स्थानिक पोलिस व वाहतूक पोलिस कारवाई करत नसल्याने चोपडावासीयांच्या मनात कमालीचा नाराजीचा सूर उमटत आहे.
शहरात गेल्या काही वर्षांपासून ‘बुलेट राजां’चे प्रस्थ वाढले आहे. बुलेटच्या सायलेन्सरमध्ये फेरफार करून किंवा वेगळ्या प्रकारचे सायलेन्सर बसवून त्यातून फटफट आवाज ऐकून कानठळ्या बसतील असा आवाज काढण्याचे प्रकार तरुणांमध्ये भलतेच लोकप्रिय झाले आहेत. या आवाजामुळे रस्त्यावरून जाणारे वाहनचालक व पायदळ चालणारे त्रस्त झाले आहेत. त्यामुळे नियमबाह्य पद्धतीने वर्तवणूक करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी सातत्याने होत आहे. ही कारवाई प्रामुख्याने वाहतूक पोलिसांकडून केली जाते. मात्र शहरातील वाहतूक विभाग छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्टँड परिसर या परिसरात उपस्थित असतांना देखील या बेशिस्त वाहनचालकांवर कुठलीच कारवाई होत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

शहरातील हरेश्वर मंदिर रोड या ठिकाणी सकाळी व सायंकाळी शहरातील अनेक वृद्ध नागरिक व महिला फिरण्यासाठी येत असतात. खासकरून सायंकाळी काही दुचाकीस्वार मॉडिफिकेशन केलेल्या दुचाकीचा कर्णकर्कश हॉर्न वाजवत व सायलेन्सरने आवाज काढत फेरफटका मारतात. यातच भर म्हणून कानठळ्या बसतील असे फटफट आवाज काढणारे सायलेन्सर यामध्ये भर टाकतात. या आवाजाच्या त्रासाने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असून पोलिस विभागाने या बुलेटराजांवर कडक दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.
शहरात अनेक वाहने विनाक्रमांकाची असून, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील वाहतूक पोलिसांना चकमा देण्यासाठी अमरधाम कडील रस्त्याचा वापर करतात. अशा वेळी विनाक्रमांकाच्या वाहनाने जर अपघात झाला तर दोष कुणाला द्यायचा ? असा प्रश्न विचारला जात आहेत. त्यामुळे शहरात बुलेटराजा आणि विना क्रमांक रस्त्यावर वेगाने दुचाकी चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी आता चोपडेकर जनता करत आहे.
