अरुणाचल प्रदेशमध्ये घुसून चिनी लष्कराने केले तरुणाचे अपहरण

0
13

अरुणाचलप्रदेश, वृत्तसंस्था । अरुणाचल प्रदेशचे खासदार तापिर गाओ यांनी काल एक धक्कादायक दावा केलाय. चीनच्या पिपल्स लिब्रेशन आर्मी म्हणजेच पीएलएने भारताच्या हद्दीमध्ये येऊन सियांग जिल्ह्यामधील एका 17 वर्षीय मुलाचे अपहरण केल्याचे गाओ यांनी म्हटलेय. गाओ यांनी अपहरण झालेल्या मुलाचे नाव मिराम तरोन असे असल्याचाही दावा केलाय.

गाओ यांच्या सांगण्यानुसार चिनी लष्कराने सियुंगला क्षेत्रामधील लुंगता जोर परिसारमधून या मुलाचं अपहरण केलेय. यापूर्वीही चिनी सैनिकांनी अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळच्या भागांमध्ये घुसखोरी केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

गाओ यांनी लोअर सुबनसिरी जिल्ह्याच्या मुख्य कार्यालयामधून फोनवर पीटीआयला दिलेल्या माहितीमध्ये, पीएलएच्या तावडीतून वाचलेला तरोनचा मित्र जॉनी यइयिंगने स्थानिक अधिकाऱ्यांना अपहरणासंदर्भातील माहिती दिल्याचा दावा केलाय. अपहरण करण्यात आलेला 17 वर्षीय मुलगा हा जिडो गावातील रहिवाशी आहे. खासदार गाओ यांनी दिलेल्या माहितीनुसार ही अपहरणाची घटना त्याच ठिकाणी झाली हे जिथे शियांग नदी चीनमधून भारतीय सीमेमधील अरुणाचलच्या भूभागात प्रवेश करते. यापूर्वी म्हणजेच मंगळवारी गाओ यांनी ट्विट करुन या मुलाचं अपहरण झाल्याचा दावा केला होता.

आपल्या ट्विटमध्ये गाओ यांनी या मुलाचा फोटोही शेअर केला आहे. “भारत सरकारच्या सर्व यंत्रणांना या तरुणाची सुखरुप आणि लवकर सुटका करण्यासाठी मी विनंती करतो,” असे गाओ यांनी कॅप्शनमध्ये म्हटले आहे.या घटनेसंदर्भात गाओ यांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री निशीथ प्रमाणिक यांनाही माहिती दिलीय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here