जळगाव ः प्रतिनिधी I येथील डॉ.जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालय व अजिंठा फिल्म सोसायटीतर्फे डॉ. बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात दोन दिवसीय देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन आज दुपारी 4 वाजता अभिनेता- दिग्दर्शक प्रा. योगेश सोमण यांच्या हस्ते होत आहे. दरम्यान, महाविद्यालय परिसरातील विविध दालनांचे उद्घाटन सकाळी करण्यात आले.
जळगावात प्रथमच मोठ्या प्रमाणात फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. फेस्टिव्हलसाठी खान्देश व मराठवाड्यातून लघुपट, डाक्युमेंट्री, कॅम्पस फिल्म, ॲनिमेशन फिल्म या चार प्रकारांत चित्रपट मागवले होते.त्यात महाराष्ट्रातून आलेल्या निवडक 50 लघुपट व माहितीपटांचे सादरीकरण होत आहे.
महाविद्यालयाच्या प्रांगणास स्व.स्मिता पाटील चित्रपट नगरी, मुख्य दालनास दादासाहेब फाळके दालन, स्व. निळू फुले दालन अशी नावे देण्यात आली आहे. या दोनदिवसीय फिल्म फेस्टिव्हलसाठी अभिनेता दिग्दर्शक, लेखक प्रा. योगेश सोमण, दिग्दर्शक प्रकाशादित्य लामा यांची विशेष उपस्थिती लाभली आहे.
महोत्सवाची सुरुवात महाविद्यालयातून 15 जानेवारीला सकाळी 10 वाजता विविध दालनांतून झाली तर उद्घाटन सोमण यांच्या हस्ते व लामा यांच्या उपस्थितीत दुपारी 4 वाजता झाले. हा महोत्सव लेवा एज्युकेशन युनियनचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांच्या मार्गदर्शनात होत आहे.महोत्सव यशस्वीतेसाठी गौरी राणे यांच्यासह सचिव अनिल भोळे, विनीत जोशी, जयंत लेकुरवाळे व इतर प्राध्यापक वर्ग परिश्रम घेत आहे.
