पाचोरा ः प्रतिनिधी
ग्रामपंचायत निवडणूक म्हटली की अनेक गमतीदार किस्से घडत असतात.या निवडणुकीत गावच्या व परिसरातील पुढार्यांची प्रतिष्ठा पणाला लागत असते.एखाद्या निवडणुकीत सासू विरुध्द सून अशी लढत होते तर काही गावात भावजय-नणंद एकमेकांसमोर उभे राहतात.एवढेच नव्हेतर काही ठिकाणी पती- पत्नी यांच्यात लढत रंगते मात्र पाचोरा तालुक्यातील डोंगरगाव ग्रामपंचायत निवडणुकीत पती-पत्नीने वेगवेगळ्या प्रभागातून नसिब अजमावले व निकाल लागल्यानंतर त्या दोघांना नशिबाने साथ दिसल्याचे स्पष्ट झाले.
डोंगरगाव येथील पंढरीनाथ मागो सावळे ( पाटील) व सौ.रत्नाबाई पंढरीनाथ सावळे ( पाटील ) हे पती-पत्नी दोन वेगवेगळ्या प्रभागातून निवडणूकीत निवडून आले आहेत. यावरच डोंगरगावसह तालुक्यातील सर्व राजकिय पक्षात व शिवसेनेचे आ. किशोर पाटील राष्ट्रवादीचे माजी आ.दिलीप वाघ, भाजपचे अमोल शिंदे यांच्या कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांमध्ये हा चर्चेचा विषय रंगला आहे.
वृत्त असे की, तालुक्यातील डोंगरगाव गावात सरपंच पंढरीनाथ मागो सावळे ( पाटील ) व सौ.रत्नाबाई पंढरीनाथ सावळे ( पाटील ) हे पती-पत्नी दोन वेगवेगळ्या प्रभागातून निवडणूकीच्या रिंगणात उभे होते.त्यांच्याकडून रोजच ग्रामपंचायत निवडणुकांचा प्रचार जोरात सुरु होता.
सकाळी पती तर सायंकाळी पत्नीच्या प्रचारफेर्या होत होत्या. यासाठी कुटुंबातील सर्वच जण निवडणूक प्रचारासाठी फिरत होते.एकाच कुटुंबात निर्माण झालेला निवडणूक उत्साह पाहून ग्रामस्थही अवाक् झाले होते.हे दोन्ही पतिपत्नी गावात सर्वांच्या सुखदुःखात मदत करत असत .गावातील कोणत्याही नागरिकाला पाचोर्यातील दवाखाना,तहसील कार्यालय, पंचायत समिती, जिल्हा परिषद, शाळा-महाविद्यालय आदी ठिकाणी कोणतेही काम असले तर त्यांना मदत करण्याचे काम हे दोघेही करत होते .गावातील येणारे-जाणारे प्रत्येक जण त्यांना विजयी होणारच असा आशीर्वाद देऊन सगळीकडे तुमची चर्चा आहे, असे सांगून त्यांची भेट घेत होते . गावातही पती-पत्नीचा विजय होणार किंवा नाही यावरच अधिक चर्चा रंगत होती मात्र गावात दोन्ही पतिपत्नी यांनी गोरगरिबांची समाजसेवा केली असून त्यांनी केलेल्या कर्तव्याचे फळ त्यांच्या पदरात निवडणुकीच्या माध्यमातून मतदारांनी टाकले आहे.