आधार प्रमाणीकरणापूर्वी मृत्यू झालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर वारसांची नोंद करून पोर्टलवर माहिती अपलोड करण्याच्या सूचना
साईमत न्यूज नेटवर्क –
मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र ठरलेल्या, मात्र आधार प्रमाणीकरण पूर्ण होण्यापूर्वी मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांबाबत शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अशा पात्र मयत शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर त्यांच्या वारसांची नोंद करून संबंधित माहिती योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे. यानंतर योजनेच्या निकषांनुसार पात्र ठरणाऱ्या वारसांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे.
राज्य शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू केली आहे. योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन पद्धतीने केली जात असून, महाआयटीमार्फत पहिल्या टप्प्यात १६ लाख ९६ हजार पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यापैकी १३ लाख ४८ हजार लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून, उर्वरित लाभार्थ्यांच्या प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, पहिल्या यादीत पात्र ठरलेल्या काही शेतकऱ्यांचा आधार प्रमाणीकरणापूर्वीच मृत्यू झाल्याचे बँकांच्या निदर्शनास आले. आधार प्रमाणीकरणाशिवाय योजनेचा लाभ देता येत नसल्याने अशा प्रकरणांमध्ये वारसांची नोंद करून त्यांच्या नावाने सुधारित माहिती योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्यासाठी शासनाने स्वतंत्र मानक कार्यप्रणाली निश्चित केली आहे.
बँकांकडून वारसांची नोंद करून माहिती अपलोड
पात्र कर्जदार शेतकऱ्याच्या मृत्यूची माहिती वारसांकडून प्राप्त झाल्यानंतर संबंधित बँकेने आपल्या प्रचलित नियमांनुसार कर्जखात्यावर वारसांची नोंद करावी. त्यानंतर योजनेच्या पोर्टलवरील ‘अपलोड डीसिज्ड अकाउंट्स’ या सुविधेद्वारे वारसांची आवश्यक माहिती ऑनलाइन अपलोड करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
वारसांचे कर्जखात्यातील हिस्सेही नोंदवणे बंधनकारक राहणार आहे. यामध्ये वारसाचे नाव, आधार क्रमांक, जन्मतारीख, लिंग, मोबाईल क्रमांक, ॲग्री स्टॅक नोंदणी, किसान ओळख क्रमांक, सीआयएफ, बचत खाते क्रमांक, पीएसीएस क्रमांक, पीएसीएस सभासद क्रमांक, कर्ज खाते क्रमांक आणि कर्जातील वारसाचा हिस्सा आदी माहितीचा समावेश आहे. तसेच मयत शेतकऱ्याचा पूर्वीचा बीआर क्रमांक आणि कर्ज खाते क्रमांक यासह संबंधित माहिती एकाच फाईलमध्ये अपलोड करण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या कर्जखात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यापूर्वी संबंधित शासकीय लेखापरीक्षकाकडून त्याची तपासणी करून घेणे आवश्यक राहणार आहे.
पात्र वारसांचे पुन्हा आधार प्रमाणीकरण
बँकांकडून अपलोड करण्यात आलेल्या कर्जखात्यांच्या माहितीची महाआयटीमार्फत योजनेच्या निकषांनुसार छाननी करण्यात येईल. त्यानंतर पात्र कर्जखात्यांची सुधारित यादी विशिष्ट क्रमांकासह प्रसिद्ध केली जाईल. या यादीतील वारसांसाठी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
योजनेचा लाभ मिळविण्यासाठी प्रत्येक पात्र वारसाचे आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक राहणार आहे. तसेच आधार प्रमाणीकरणापूर्वी किंवा प्रमाणीकरणाच्या वेळी ॲग्री स्टॅक नोंदणी अथवा शेतकरी ओळख क्रमांक असणेही बंधनकारक करण्यात आले आहे.
एका मयत शेतकऱ्याच्या कर्जखात्यावर एकापेक्षा अधिक वारस असल्यास, योजनेच्या निकषांनुसार कर्जाच्या रकमेत असलेल्या त्यांच्या हिस्स्याच्या प्रमाणात कर्जमुक्तीची रक्कम संबंधित कर्जखात्यात वर्ग केली जाणार आहे. मात्र, योजनेच्या निकषांनुसार एखादा वारस अपात्र ठरल्यास त्याला कर्जमुक्तीचा लाभ मिळणार नाही.
तातडीने कार्यवाहीच्या सूचना
पात्र मयत लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांबाबत निश्चित केलेल्या मानक कार्यप्रणालीनुसार तातडीने कार्यवाही करून पात्र वारसांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या सूचना सहकार आयुक्त तथा सहकारी संस्था निबंधक दीपक तावरे यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांना दिल्या आहेत.
