साईमत न्यूज नेटवर्क –
पाटणा : बिहारमधील सीवान जिल्ह्यात २५ जुलै रोजी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस शिपायाने ‘एके-४७’ रायफलमधून गोळीबार केल्याच्या गंभीर प्रकरणाची राज्य सरकारने दखल घेतली आहे. या घटनेप्रकरणी सीवानचे पोलीस अधीक्षक पूरण कुमार झा यांची पदावरून बदली करण्यात आली असून, त्यांना सध्या नव्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आले आहे. गोळीबार करणाऱ्या पोलीस शिपायाला यापूर्वीच निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयातही सुनावणी सुरू असून, बिहार सरकारने न्यायालयात प्रतिज्ञापत्र साद करून पोलिसांकडून करण्यात आलेल्या गोळीबाराबाबत स्पष्टीकरण दिले आहे. आंदोलकांनी घेरल्याने स्वतःच्या बचावासाठी संबंधित शिपायाने ‘एके-४७’मधून हवेत चार फेऱ्या झाडल्याचा दावा सरकारने केला आहे. या गोळीबारात कोणताही आंदोलक जखमी झाला नसल्याचेही सरकारने प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
ही घटना सीवानमधील जेपी चौकाजवळ घडली होती. आंदोलनादरम्यान आंदोलकांनी पोलिसांना घेरल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यावेळी संबंधित पोलीस शिपायाने स्वतःच्या बचावासाठी हवेत चार गोळ्या झाडल्याचे सरकारचे म्हणणे आहे. मात्र, त्याच दिवशी झालेल्या पोलीस कारवाईत अन्य तीन आंदोलक किरकोळ जखमी झाल्याचे राज्य सरकारने मान्य केले आहे.
या जखमी आंदोलकांचा ‘एके-४७’च्या गोळीबाराशी कोणताही संबंध नसल्याचेही सरकारने स्पष्ट केले. हे तिन्ही आंदोलक शिपायाने गोळीबार केलेल्या ठिकाणी उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांच्या दुखापती ‘एके-४७’मधून झाडलेल्या चार फेऱ्यांमुळे झालेल्या नसल्याचा दावा सरकारने केला आहे.
याच आंदोलनादरम्यान हाथी चौक परिसरात गर्दी पांगवण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश कुमार सिंह यांनी त्यांच्या नऊ एमएम पिस्तुलातून दोन फेऱ्या झाडल्याचेही सरकारने न्यायालयाला सांगितले. आंदोलन हाताळताना पोलिसांनी संयम बाळगला असून, कोणताही अतिरिक्त किंवा अनावश्यक बळाचा वापर करण्यात आला नसल्याचे बिहार सरकारने प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
मात्र, पोलीस शिपायाच्या हातात ‘एके-४७’सारखे अत्याधुनिक आणि घातक शस्त्र कसे आले, यावरून राजकीय वर्तुळात प्रश्न उपस्थित झाले आहेत. बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
विद्यार्थी आंदोलनासाठी तैनात असलेल्या सामान्य पोलीस शिपायाला ‘एके-४७’ रायफल कोणी दिली, ती कोणत्या शस्त्रागारातून देण्यात आली आणि असे घातक शस्त्र सोपवण्यास परवानगी कोणी दिली, असे सवाल यादव यांनी उपस्थित केले आहेत. या शस्त्रवाटपामागील संपूर्ण आदेशसाखळीची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, सीवानचे पोलीस अधीक्षक पूरण कुमार झा यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. गोळीबार करणाऱ्या शिपायाचे निलंबन आणि आता पोलीस अधीक्षकांवरील कारवाईनंतर या घटनेच्या पुढील चौकशीत आणखी कोणावर कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
