साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
दिव्यांग तक्रारदाराच्या कामासाठी १० हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती ७ हजार रुपये स्वीकारताना एका खासगी एजंटाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. योगेश रामभाऊ पाटील (वय ३२) असे कारवाई करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. या धडक कारवाईने लाचखोरांच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने महावितरण (वीज कंपनी) कार्यालयात तात्पुरती नोंदणी (रजिस्ट्रेशन) करण्यासाठी या खासगी एजंटाची मदत घेतली होती. मात्र, हे काम करून देण्याच्या मोबदल्यात संशयित योगेश पाटील याने तक्रारदाराकडे सुरुवातीला १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. अखेर तडजोडीअंती ७ हजार रुपये देण्याचे ठरले.
तक्रारदाराची इच्छा नसल्याने त्यांनी याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने पडताळणी केल्यानंतर इच्छादेवी चौक परिसरातील बजाज टीसीएस शोरूमजवळ सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना योगेश पाटील याला पथकाने रंगेहात ताब्यात घेतले.
याप्रकरणी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या धडक कारवाईचे नागरिक आणि दिव्यांग बांधवांकडून कौतुक केले जात आहे.
