साईमत -पारोळा- प्रतिनिधी |
ग्रामसभेत ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांचा भडिमार आणि निर्माण झालेल्या तणावाच्या धसक्याने ग्रामसेवकाची प्रकृती बिघडून उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शिवरे दिगर (ता. पारोळा) येथे घडली. प्रल्हाद नारायण पाटील (रा. बोदरडे, ता. पारोळा) असे मृत ग्रामसेवकाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवरे दिगर येथे १७ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेदरम्यान काही ग्रामस्थांनी ग्रामसेवक प्रल्हाद पाटील यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करत त्यांना घेराव घातला. या अचानक उद्भवलेल्या तणावामुळे पाटील यांची प्रकृती बिघडली. “माझ्या छातीत दुखत आहे, मला दवाखान्यात जाऊ द्या,” असे सांगून ते दुचाकीवरून निघत असताना काही ग्रामस्थ त्यांच्या मागे धावले.
या प्रकारामुळे प्रचंड घाबरलेल्या स्थितीत ते पारोळा येथील खाजगी रुग्णालयात दाखल झाले.पारोळ्यातील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यांना तातडीने धुळे येथे हलवण्याचा सल्ला दिला. मात्र, खाजगी वाहनाने धुळे येथे घेऊन जात असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
दोषींवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गर्दी
या घटनेची माहिती मिळताच ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार बोराडे, सचिव संजय भारंबे, सल्लागार आर. एम. पवार, तालुका अध्यक्ष श्याम कुमार पाटील, सचिव सुनील बेलदार यांच्यासह तालुक्यातील सर्व ग्रामसेवक पारोळा पोलीस ठाण्यात एकवटले. मानसिक छळ करून मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी त्यांनी केली.
सुमारे सहा तास चाललेल्या या वादात पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी मध्यस्थी केली. सुरुवातीला अकस्मात मृत्यूची (अकस्मात मृत्यू नोंद) नोंद करून, पुरावे गोळा केल्यानंतर दोषींवर गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) करिष्मा नायर यांनी पोलीस निरीक्षकांशी चर्चा केल्यानंतर रात्री उशिरा अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली.
विविध संघटनांकडून तीव्र निषेध
या दुर्दैवी घटनेचा पारोळा तालुका ग्रामसेवक संघटना, जिल्हा ग्रामसेवक संघटना, ग्राम रोजगार सेवक संघटना आणि श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे. ग्रामपंचायत अधिकाऱ्याचा मानसिक छळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करून दोषींना तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीचे निवेदन ‘श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेने’च्या वतीने पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना देण्यात आले आहे.
