साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
शहरातील शनिपेठ परिसरात एका सोन्याच्या कारागिराचा विश्वास संपादन करून तब्बल २ कोटी ४५ लाख ७४ हजार ७६० रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवून फसवणूक केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोन संशयितांविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिपेठ भागात ‘आयुष ज्वेलर्स’ नावाने सोनारी व्यवसाय करणारे नबाकुमार गोरहरी धारा (वय ४१) यांची पश्चिम बंगालमधील विद्युत निरोध बाग आणि राजु बिपीन चौधरी या दोघांशी ओळख होती. या ओळखीचा फायदा घेत संशयितांनी नबाकुमार यांचा विश्वास संपादन केला.
ऑक्टोबर २०२५ ते ३० मे २०२६ या कालावधीत दोन्ही आरोपींनी नबाकुमार यांच्या दुकानातून वेळोवेळी १७५५.३४० ग्रॅम वजनाचे २२ कॅरेट शुद्धतेचे तयार सोन्याचे दागिने नेले. या दागिन्यांच्या बदल्यात २४ कॅरेट सोन्याची लगड (बिस्कीट) किंवा रोख रक्कम देण्याचे ठरले होते. मात्र, दीर्घकाळ उलटूनही आरोपींनी पैसे किंवा सोन्याची लगड न देता टाळाटाळ सुरू ठेवली.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नबाकुमार धारा यांनी १७ ऑगस्ट रोजी शनिपेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. त्यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी विद्युत बाग आणि राजु चौधरी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३१८(४) व ३१६(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेनंतर दोन्ही आरोपी पसार झाले असून पोलीस उपनिरीक्षक संतोष खेडकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या मोठ्या फसवणुकीच्या घटनेमुळे जळगावातील सुवर्ण आणि सराफ बाजारात मोठी खळबळ उडाली आहे.
