महादेवाच्या दर्शनासाठी पहाटेपासून गर्दी ; ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमले भाविकांनी घेतले स्वयंभू महादेवाचे दर्शन
साईमत /जळगाव / प्रतिनिधी :
श्रावणातील पहिल्या सोमवारी सोनी नगर परिसरातील जागृत स्वयंभू महादेव मंदिरात भक्तीचा जागर पाहायला मिळाला. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. महादेवाच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला असून, नागपंचमीच्या पर्वामुळे यंदाच्या पहिल्या श्रावण सोमवारला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले.
पहाटे पाच वाजता अजय बागडे व आशा बागडे यांच्या हस्ते भगवान महादेवाला जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर बेलपत्र, फुले व नैवेद्य अर्पण करून विधिवत पूजा करण्यात आली. सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रांग लागली होती. परिसरातील महिला, पुरुष तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या श्रद्धेने महादेवाचे दर्शन घेतले.
श्रावण सोमवारच्या निमित्ताने शिवलिंगावर गंगाजल, दूध आणि पांढरे पाणी अर्पण करण्यात आले. ‘ॐ नमः शिवाय’च्या जपाने मंदिर परिसर भक्तिमय झाला होता. अनेक भाविकांनी उपवास करून भगवान शिवाची आराधना केली. पहिल्या श्रावण सोमवारी तांदळाची शिवामूठ वाहण्याची परंपरा असल्याने भाविकांनी ‘शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा…’ असा जयघोष करत तांदळाची शिवामूठ अर्पण केली.
यावेळी आयोजित महाआरतीचा मान उद्योजक रवींद्र लढ्ढा यांना मिळाला. महाआरतीनंतर लढ्ढा यांनी श्रावण महिन्याचे धार्मिक महत्त्व सांगताना, भगवान शिवाच्या उपासनेसाठी श्रावण महिना पवित्र मानला जातो. विशेषतः श्रावण सोमवार हा शिवभक्तांसाठी श्रद्धेचा दिवस असून, या दिवशी मनोभावे केलेली शिवआराधना भक्तांना आध्यात्मिक समाधान देणारी ठरते, असे सांगितले.
महाआरतीप्रसंगी नरेश बागडे, विनोद निकम, सरदार राजपूत, यशवंत पाटील, विजय चव्हाण, मधुकर ठाकरे, नारायण येवले, धनंजय सोनार, चंद्रकांत जोशी, गोपाल तायडे, शैलेश जोशी, ओमकार जोशी यांच्यासह महिला मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती.
पहाटे पाच वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत मंदिरात भाविकांची गर्दी कायम होती. दर्शन, अभिषेक, शिवामूठ अर्पण आणि महाआरतीमुळे संपूर्ण दिवस मंदिर परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण होते. श्रावणातील पहिल्याच सोमवारी हजारो भाविकांनी स्वयंभू महादेवाच्या चरणी नतमस्तक होत भक्तिभावाने शिवआराधना केली.
