जळगाव प्रतिनिधी | मन्यारखेडा गावालगत असलेल्या श्री बदरीनाथ मंदिरात हिमालयातील श्री बदरीनाथ धामच्या परंपरेनुसार नर-नारायण जयंती उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी मंदिरात उपस्थित राहून श्री नर-नारायण भगवानांचे दर्शन घेतले.
दुपारी १२ वाजता भगवंतांचा जन्मोत्सव व फुलबंगला दर्शनाचा कार्यक्रम पार पडला. यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. संध्याकाळी ४ वाजता श्री नर-नारायण भगवानांची पालखी (डोली) काढण्यात आली. पालखीने मन्यारखेडा गावातून नगरप्रदक्षिणा पूर्ण केली.
रात्री ९ वाजता गादीपती श्री मयूरगोविंदजी महाराज यांचे नर-नारायण भगवानांच्या जन्मोत्सवानिमित्त बदरीनाथ परंपरेनुसार विशेष कीर्तन झाले. या कीर्तनाला भाविकांची मोठी उपस्थिती होती.
जन्मोत्सवानिमित्त संपूर्ण मंदिर परिसर निशिगंधाच्या सुगंधी फुलांनी आकर्षक पद्धतीने सजविण्यात आला होता. फुलांची मनोहारी सजावट, धार्मिक विधी, पालखी सोहळा आणि कीर्तनामुळे मंदिर परिसर दिवसभर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.
अशा उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात नर-नारायण जयंती उत्सवाची सांगता झाली. दिवसभरात हजारो भाविकांनी श्री बदरीनाथ मंदिरात दर्शन घेऊन धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेतला.
