जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी वंदे मातरम् गीताच्या संदर्भातून काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना पुस्तक पाठवले. जळगाव शहरातील आमदार सुरेश भोळे यांच्या निवासस्थानावरून चित्रा वाघ यांनी लिफाफ्यावर सोनिया गांधी यांचा दिल्लीतील पत्ता स्वतःच्या हाताने लिहिला आणि हे पुस्तक पोस्टाने पाठवण्यासाठी पोस्टमनकडे सुपूर्द केले.
वंदे मातरम् सुरू असताना सोनिया गांधी यांनी केलेल्या कृतीवर चित्रा वाघ यांनी तीव्र आक्षेप घेतला. संबंधित कृती हा देशाचा आणि राष्ट्रगीताचा अपमान असल्याचा आरोप त्यांनी केला. देशप्रेम केवळ नाव किंवा आडनावामुळे सिद्ध होत नाही, तर ते रक्तात आणि कृतीत असावे लागते, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.
सोनिया गांधी यांनी हे पुस्तक वाचावे आणि त्यांच्या मुलालाही वाचायला द्यावे, असा सल्ला चित्रा वाघ यांनी दिला. वंदे मातरम् गीतामागील इतिहास, भावना आणि देशभक्तीची भूमिका समजून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या कृतीतून वंदे मातरम् विषयावर राजकीय वादाला पुन्हा तोंड फुटण्याची शक्यता आहे. चित्रा वाघ यांच्या या भूमिकेवर काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
