बनावट आदेशांच्या माध्यमातून ५०० ते ६०० कोटींची फसवणूक झाल्याचा संशय; जामनेर तालुक्यातील दोघांसह धुळ्याचा एक संशयित रडारवर
साईमत /जळगाव/ प्रतिनिधी :
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील आगामी कुंभमेळ्याच्या कामांच्या नावाखाली बनावट कार्यारंभ आदेश तयार करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. नाशिक विभागाचे महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या नावाचा तसेच ‘एस’ अक्षराच्या डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर करून हुबेहूब बनावट कार्यारंभ आदेश तयार करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या माध्यमातून तब्बल ५०० ते ६०० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची शक्यता कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
कुंभमेळ्याच्या बंदोबस्तासाठी नाशिक शहर पोलिसांसह राज्य राखीव दलातील पोलिसांसाठी जेवण, पिण्याचे पाणी, चटया, बादल्या, चादरी तसेच अन्य साहित्य पुरविण्याच्या कामांच्या नावाखाली हे बनावट कार्यारंभ आदेश देण्यात आल्याचे महाजन यांनी सांगितले. प्रत्येक बनावट आदेशाची रक्कम साधारणपणे १०० ते १५० कोटी रुपयांच्या आसपास असल्याची माहितीही त्यांनी दिली.
कुंभमेळ्याशी संबंधित कामांसाठी शासनाकडून ऑनलाइन निविदा प्रक्रिया राबविण्यात येते. मात्र, या प्रकरणातील ज्या व्यक्तींना कार्यारंभ आदेश देण्यात आले, त्यांनी संबंधित कामांसाठी कोणतीही ऑनलाइन निविदा भरलेली नव्हती. तरीही संशयितांनी संबंधितांकडून रोख रक्कम तसेच धनादेशाच्या माध्यमातून पैसे उकळले आणि त्यांना ऑफलाइन कार्यारंभ आदेश देण्यात आले. हे आदेश शासनाच्या अधिकृत कागदपत्रांसारखेच हुबेहूब तयार करण्यात आल्याने अनेक जण फसवणुकीच्या जाळ्यात अडकल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.
अधिकृत कार्यारंभ आदेशावर क्यूआर कोड असतो. तसेच महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांचे नाव अशा स्वरूपात नमूद केले जात नाही. मात्र, बनावट आदेशांमध्ये गेडाम यांचे नाव वापरण्यात आले असून, त्यांच्या नावासमोर केवळ ‘एस’ अक्षराची डिजिटल स्वाक्षरी करण्यात आली आहे. त्यामुळे आदेशांची पडताळणी केल्यानंतर हा प्रकार नियोजनबद्ध कटाचा भाग असल्याचा संशय अधिक बळावल्याचे महाजन यांनी सांगितले.
या प्रकरणातील चार-पाच व्यक्ती नुकत्याच आपल्याकडे आल्या होत्या. त्यांनी काही कार्यारंभ आदेश दाखविल्यानंतर त्यातील विसंगती लक्षात आली. सध्या त्यांच्याकडे चार बनावट कार्यारंभ आदेश असल्याचेही महाजन यांनी सांगितले. मार्च आणि एप्रिल महिन्यातील हे आदेश असून, त्यांच्या माध्यमातून संबंधितांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळण्यात आल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.
या रॅकेटमध्ये जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील दोन व्यक्ती आणि धुळे जिल्ह्यातील एका व्यक्तीचा सहभाग असल्याचा संशय असल्याचे महाजन यांनी सांगितले. या तिघांसह आणखी काही व्यक्ती या फसवणुकीच्या जाळ्यात सहभागी असण्याची शक्यता असून, तपास पुढे गेल्यानंतर आणखी नावे समोर येऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर महसूल आयुक्त प्रवीण गेडाम तसेच कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्याशी चर्चा करण्यात आल्याचे महाजन यांनी सांगितले. शासनाच्या नावाचा आणि अधिकृत कागदपत्रांचा गैरवापर करून बनावट कार्यारंभ आदेश तयार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकाराची गंभीर दखल घेत संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्याचे महाजन यांनी सांगितले.
कुंभमेळ्याच्या कामांच्या नावाखाली बनावट कार्यारंभ आदेश देऊन फसवणूक करण्याचा हा प्रकार प्रथमच समोर आलेला नाही. यापूर्वी मुंबईतील तीन व्यक्तींनी अशाच पद्धतीने बनावट आदेश तयार करून काहींची फसवणूक केली होती. त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता पुन्हा त्याच पद्धतीने फसवणुकीचे प्रकरण समोर आल्याने या रॅकेटची व्याप्ती मोठी असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. फसवणूक झालेल्यांमध्ये मुंबईसह छत्रपती संभाजीनगर येथील व्यक्तींचाही समावेश असल्याचे महाजन यांनी सांगितले.
विशेष म्हणजे, बनावट कार्यारंभ आदेश तयार करताना शासनाच्या अधिकृत कागदपत्रांची हुबेहूब नक्कल करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात केवळ बाहेरील व्यक्तींचाच सहभाग आहे की शासनातील अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांचीही काही भूमिका आहे, याचाही तपास केला जाणार आहे. अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचा सहभाग आढळल्यास त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा महाजन यांनी दिला.
दरम्यान, कुंभमेळ्याच्या कामांच्या नावाखाली कोणत्याही व्यक्तीने परस्पर पैसे देऊन कार्यारंभ आदेश घेऊ नयेत, असे आवाहन महाजन यांनी केले आहे. शासनाची अधिकृत निविदा प्रक्रिया आणि संबंधित विभागाकडून आदेशाची खात्री केल्याशिवाय कोणत्याही कागदपत्रावर विश्वास ठेवू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. ज्यांची या माध्यमातून फसवणूक झाली आहे, त्यांनी पुढे येऊन पोलिसांत तक्रार दाखल करावी. तक्रारींच्या आधारे या रॅकेटचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
