राजस्थानातील फर्मकडून सात लाख येणे बाकी ; भावाला ‘केस कर, कॉल लिस्ट तपास’चा संदेश
साईमत /जळगाव/ प्रतिनिधी :
राजस्थानातील एका फर्मकडून मालाचे तब्बल सात लाख रुपये येणे बाकी असताना वारंवार पाठपुरावा करूनही पैसे मिळत नसल्याने जळगावातील कंपनी मालकाने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना सोमवारी (१० ऑगस्ट) एमआयडीसी परिसरात उघडकीस आली. योगेश एकनाथ नेमाडे (वय ३९, रा. ईश्वर कॉलनी) यांनी एमआयडीसीतील महालक्ष्मी इरिगेशन कंपनीत गळफास घेऊन जीवन संपविले. त्यांच्या मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये राजस्थानातील संबंधित फर्म व तिच्या मालकाचा उल्लेख करण्यात आल्याने या घटनेला गंभीर वळण मिळाले आहे.
योगेश नेमाडे हे त्यांचे बंधू मनूर नेमाडे यांच्यासोबत एमआयडीसीतील एम-९१ सेक्टरमध्ये महालक्ष्मी इरिगेशन नावाची कंपनी चालवत होते. सोमवारी योगेश हे कंपनीत गेले होते. याच ठिकाणी त्यांनी गळफास घेतला. हा प्रकार त्यांच्या भावाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, सुसाईड नोटच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.
सात लाखांची उधारी, वारंवार पाठपुरावा
योगेश नेमाडे यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये राजस्थानमधील धार जिल्ह्यातील राजोद येथील एका फर्मकडून मालाचे सात लाख रुपये येणे बाकी असल्याचा उल्लेख आहे. संबंधित फर्मच्या मालकाकडे वारंवार पैशांची मागणी करूनही रक्कम मिळत नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे. फोन करूनही संबंधित व्यक्ती फोन उचलत नसल्याने आपण मानसिक त्रासाला कंटाळलो असल्याचेही नोटमध्ये लिहिले असल्याचे समोर आले आहे.
संबंधित व्यक्तीने यापूर्वी १३ हजार रुपये, तर घटनेच्या आदल्या दिवशी आठ हजार रुपये दिल्याचा उल्लेखही सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे. मात्र, मोठी रक्कम अद्याप बाकी असल्याने योगेश नेमाडे आर्थिक अडचणीत होते, असे या मजकुरावरून स्पष्ट होते.
भावाला ‘केस कर, कॉल लिस्ट तपास’चा संदेश
सुसाईड नोटमध्ये योगेश यांनी त्यांच्या भावाला संबंधित व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्याचा संदेश दिला आहे. ‘त्याला सोडू नकोस, केस कर, कॉल लिस्ट नक्की चेक करा’, असा उल्लेख त्यांनी केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणात संबंधित फर्मच्या मालकाची भूमिका काय होती, तसेच पैशांच्या व्यवहारासंदर्भात नेमके काय घडले, याचा तपास पोलिसांकडून केला जाण्याची शक्यता आहे.
पत्नी व मुलीचाही उल्लेख
सुसाईड नोटमध्ये योगेश यांनी पत्नीला उद्देशून काही ओळी लिहिल्या असून, मुलीचा व्यवस्थित सांभाळ करण्याचे आवाहन केले आहे. तसेच कुटुंबातील काही सदस्यांची नावे नमूद करून त्यांना काही सल्ले दिले असून, झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितल्याचेही समोर आले आहे. याशिवाय स्वतःकडून कोणाकडून किती पैसे घेतले आहेत आणि कोणाला किती रक्कम द्यायची आहे, याचाही तपशील त्यांनी नोटमध्ये नमूद केला आहे.
या घटनेमुळे जळगावच्या औद्योगिक परिसरात खळबळ उडाली असून, आर्थिक व्यवहारातून निर्माण झालेल्या तणावामुळे ही घटना घडल्याचे प्राथमिकदृष्ट्या समोर येत आहे. मात्र, सुसाईड नोटमधील आरोपांची सत्यता, संबंधित फर्मकडून झालेला आर्थिक व्यवहार आणि या घटनेमागील नेमकी कारणे पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार आहेत.
