तीन बैलजोड्यांसह ७.१० लाखांचा मुद्देमाल जप्त; चौथा आरोपी फरार
साईमत /सावदा, ता. रावेर/ प्रतिनिधी :
सावखेडा बुद्रुक परिसरातून अवघ्या काही तासांत तीन बैलजोड्या लंपास करणाऱ्या टोळीचा सावदा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत तिघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या सहा बैलांसह गुन्ह्यात वापरलेली बोलेरो मॅक्स पिकअप आणि मोटारसायकल असा तब्बल ७ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणातील एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
सावखेडा बुद्रुक परिसरातील गोठ्यांमधून ७ ऑगस्ट रोजी मध्यरात्री साडेबारा ते पहाटे पाच वाजेच्या सुमारास अलाउद्दीन नबाबत तडवी, गुलशेर बशीर तडवी आणि संजु नबाब तडवी यांच्या मालकीच्या तीन बैलजोड्या चोरीला गेल्या होत्या. या बैलजोड्यांची किंमत सुमारे ९० हजार रुपये होती. या घटनेने परिसरातील पशुपालकांमध्ये खळबळ उडाली होती. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश बाविस्कर यांच्याकडे सोपविण्यात आल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. त्यात चोरीच्या वेळेच्या आसपास मोटारसायकलवरून संशयास्पद हालचाली करणारे दोन जण आढळून आले. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आवेश खान एजाज खान (वय २०, रा. खाजानगर, सावदा) आणि शेख हयात शेख मासुम (वय २५, रा. मन्यारवाडा, चिनावल) यांना ताब्यात घेतले.
चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली देत शेख नासीर शेख चाँद कुरेशी (वय ४२, रा. प्रतिभानगर, वरणगाव) आणि शेख राजीक (रा. रसलपूर, ता. रावेर) यांच्या साथीने बैल चोरी केल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत चोरीस गेलेल्या तिन्ही बैलजोड्या हस्तगत केल्या. सहा बैल मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
तपासादरम्यान नासीर शेख चाँद कुरेशी याला अटक करून त्याच्याकडून ६ लाख रुपये किमतीची महिंद्रा बोलेरो मॅक्स पिकअप आणि २० हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल जप्त करण्यात आली. बैलांची किंमत आणि जप्त वाहनांसह एकूण ७ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे.
या प्रकरणातील फरार आरोपी शेख राजीक याचा पोलीस शोध घेत आहेत. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड, पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप, सफौ जयराम खोडपे, पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश बाविस्कर, मेहरबान तडवी, संजीव चौधरी, अतुल तडवी, पोलीस कॉन्स्टेबल संजय तडवी व चालक नामदेव कापडे यांच्या पथकाने केली.
