पाण्याच्या टाकीची तपासणी करताना तोल गेला; कर्मचाऱ्याचा मृत्यू
साईमत /मुंबई / प्रतिनिधी
पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डासांच्या उत्पत्तीस्थळांचा शोध घेत असताना मुंबई महानगरपालिकेच्या कीटकनाशक विभागातील कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. नायगाव परिसरातील पोलीस कॅम्पमधील पाण्याच्या टाकीची पाहणी करताना तोल जाऊन खाली पडल्याने पांडुरंग तोडकर (४७) यांचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे महापालिका कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पावसाळ्याच्या काळात डासांची उत्पत्ती वाढून मलेरिया, डेंग्यू यांसारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होऊ नये, यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून विशेष मोहीम राबविण्यात येते. या मोहिमेत विविध भागांतील पाण्याची साचलेली ठिकाणे, पाण्याच्या टाक्या तसेच डासांच्या अळ्यांची उत्पत्ती होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांची नियमित पाहणी केली जाते. पावसाळ्यापूर्वी सुरू करण्यात आलेली ही मोहीम पावसाळ्यातही सातत्याने सुरू ठेवली जाते.
याच मोहिमेअंतर्गत एफ-दक्षिण विभाग कार्यालयाच्या हद्दीतील नायगाव पोलीस कॅम्पमधील इमारतीवरील पाण्याच्या टाकीची पाहणी करण्यासाठी पांडुरंग तोडकर शनिवारी सकाळी गेले होते. लोखंडी स्टॅण्डवर ठेवलेल्या पाण्याच्या टाकीची तपासणी करण्यासाठी ते वर गेले असता अचानक त्यांचा तोल गेला. त्यामुळे ते खाली कोसळले. या दुर्घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाली.
घटनेनंतर तोडकर यांना तातडीने उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. पाण्याच्या टाकीजवळ पडलेल्या लोखंडी सळ्यांमुळे त्यांना गंभीर दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या दुर्घटनेनंतर पाण्याच्या टाक्यांच्या परिसरातील सुरक्षिततेचा प्रश्न गंभीरपणे उपस्थित झाला आहे. टाक्यांच्या आजूबाजूला पडून असलेले लोखंडी साहित्य, अडगळ आणि इतर धोकादायक वस्तूंमुळे पाहणीसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना धोका निर्माण होऊ शकतो. डासांच्या उत्पत्तीस्थळांचा शोध घेण्याचे काम करताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना अनेकदा अरुंद, उंच किंवा धोकादायक ठिकाणी जावे लागते. अशा परिस्थितीत त्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती साधने आणि सुरक्षित कार्यपद्धती उपलब्ध करून देण्यात आली आहे का, असा सवाल या घटनेनंतर उपस्थित होत आहे.
पांडुरंग तोडकर यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे महापालिकेच्या कीटकनाशक विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ आणि संताप व्यक्त होत आहे. कर्मचारी संघटनांनीही या घटनेबाबत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. कर्मचाऱ्यांना धोकादायक ठिकाणी पाहणीसाठी पाठविताना आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करून देणे, सुरक्षित कार्यपद्धती निश्चित करणे आणि धोकादायक ठिकाणांची पूर्वपाहणी करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज या दुर्घटनेने अधोरेखित केली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने तातडीने ठोस सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
